उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्तेवर आल्यापासून नवनवीन निर्णय घेण्याचा धडाका लावल्याचे दिसत आहे. आता ते राज्यातील वंचित व आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्यांसाठी ५ रूपयांत भरपेट जेवण देण्याचा विचार करत आहेत. या ५ रूपयांच्या ‘थाळी’त भात, चपाती, डाळ, एक भाजी आणि पापड असेल. अनेकांना एकवेळचे जेवणही मिळत नाही, अशांसाठी हा दिलासादायक निर्णय असेल, असे मत उत्तर प्रदेशचे दुग्धविकास व सांस्कृतिक मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी ‘पीटीआय’शी बोलताना म्हटले.

याबाबत अधिक माहिती देताना चौधरी म्हणाले, मी नुकताच छत्तीसगड येथे दौऱ्यावर गेलो होतो. त्यावेळी मी तेथील सरकारकडून देण्यात येत असलेल्या ५ रूपयांत मिळणाऱ्या थाळीचा आस्वाद घेतला. मी तेथे असताना अनेकवेळा ५ रूपयांत जेवण केले. ते अन्न खूप स्वच्छ, चांगलं आणि चवदार होते. मी तेथील स्वच्छतेवरही खूप समाधानी आहे, असे कौतुकही त्यांनी केले.

गत महिन्यात मध्य प्रदेश सरकारनेही ‘दिनदयाल रसोई योजना’ सुरू केली आहे. या योजनेत गरिबांना ५ रूपयांत जेवण देण्यात येते. सध्या ही योजना मर्यादित ठिकाणी राबवण्यात येत आहे. दि. ७ एप्रिल रोजी मध्य प्रदेश सरकारने भोपाळ आणि ग्वाल्हेर येथे ही योजना सादर केली होती.

तामिळनाडूमध्ये अम्मा कँटिन नावाने सवलतीच्या दरात नाश्ता, जेवण पुरवले जाते. ही योजना राज्य सरकारकडून राबवली जाते. तामिळनाडूमध्ये योजना कमालीची लोकप्रिय ठरली आहे. महानगरपालिका, राज्यातील सरकारी कार्यालयातील कँटिनमधून ही योजना राबवली जाते.