बोफोर्स प्रकरणात जे करता आले नाही, ते ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहाराचा छडा लावून करून दाखवू शकू, असा विश्वास संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी शुक्रवारी लोकसभेत व्यक्त केला. ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणात लोकसभेत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांना पर्रिकर यांनी सविस्तर उत्तरे दिली. यावेळी त्यांनी उत्तराच्या शेवटी हा मुद्दा मांडला.


तत्पूर्वी चर्चेच्या सुरुवातीला ते म्हणाले, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदीचे कंत्राट ऑगस्टा वेस्टलॅंड याच कंपनीला मिळावे, यासाठी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील यूपीए सरकारच्या काळात जे काही करता येईल, ते सगळे केले गेले. या प्रकणार लाचखोरीचे पैसे कोणाकोणाला मिळाले आहेत, त्याचा छडा आम्ही नक्कीच लावू. माजी हवाई दल प्रमुख एस. पी. त्यागी तसेच गौतम खैतान हे दोघेही या प्रकरणातील छोटे मासे आहेत. त्यांनी केवळ भ्रष्टाचाराच्या वाहत्या पाण्यामध्ये आपले हात धुवून घेतले आहेत. पण हे वाहते पाणी कुठे जाऊन पोहोचले, याचा शोध नक्की घेण्यात येईल. या खरेदी व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचे समजल्यावर तत्कालिन यूपीए सरकारने स्वतःहून कोणतीही कारवाई केली नाही. परिस्थितीमुळे त्यांना कंपनीविरुद्ध कारवाई करायला लागली, असेही त्यांनी सांगितले.