संरक्षणमंत्री पर्रिकर यांचा लोकसभेत इशारा

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्यात लाच घेण्याच्या संदर्भात कुणाचेही नाव न घेता संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी लोकसभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. याच कंपनीला कंत्राट मिळावे यासाठी यापूर्वीच्या यूपीए सरकारने ‘सारे काही’ केल्याचा आरोप त्यांनी केला. बोफोर्स प्रकरणी आम्ही जे करू शकलो नाही, ते या प्रकरणी करू शकू. यासाठी लाच घेणाऱ्या प्रमुख लोकांचा सरकार शोध लावील, असे पर्रिकर यांनी जाहीर केले. विशेष म्हणजे इटलीतील ज्या न्यायाधीशांनी या खटल्याचा निकाल दिला होता त्यांनी या प्रकरणात एकाही भारतीय नेत्याचे नाव मी घेतलेले नाही किंवा कोणाहीविरोधात ठोस पुरावाही समोर आलेला नाही, असे दोनच दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. त्यामुळे या निकालाचा आधार पर्रिकर यांनी घेणे टाळले.

हेलिकॉप्टर खरेदीच्या व्यवहारातील ‘संपूर्ण भ्रष्टाचार’ यूपीए सरकारच्या कार्यकाळात झाला. माजी वायुदल प्रमुख एस. पी. त्यागी व गौतम खेदान या ‘छोटय़ा लोकांनी’ केवळ वाहत्या गंगेत हात धुवून घेतले, मात्र ही गंगा कुठे जाते हे सरकार शोधून काढेल, असे पर्रिकर यांनी सांगितले. कंत्राट देण्याबाबतचा निर्णय २०१० साली घेण्यात आला असला तरी त्यागी २००७ मध्येच निवृत्त झाले आणि त्यांना केवळ ‘चिल्लर’ मिळाली असावी, असे ते म्हणाले.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा अशी मागणी करत काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. मात्र सीबीआय या प्रकणाचा ‘अतिशय गंभीरपणे’ तपास करत आहे, असे उत्तर देत पर्रिकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीचा मुद्दा टाळला.  ऑगस्टा व्यवहारातील भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर यूपीएने कंपनीविरुद्ध केलेली कारवाई स्वत:हून नव्हती, तर ‘परिस्थितीमुळे भाग पडल्याने’ होती, असा दावाही पर्रिकर यांनी केला.