राष्ट्रकूल आणि अन्य घोटाळ्याशी संबंधित व्यक्तींची नावे वगळण्यासाठी यूपीए सरकारमधील काही नेत्यांनी माझ्यावर दबाव टाकला होता असा गौप्यस्फोट नियंत्रण आणि महालेखापरिक्षक विभागाचे (कॅग) माजी प्रमुख विनोद राय यांनी केला आहे.
‘काही नेते माझ्या घरी आले होते व त्यांनी राष्ट्रकूल आणि कोळसा घोटाळ्याप्रकरणी कॅगने दिलेल्या अहवालातून काही व्यक्तींची नावे हटवा किंवा त्यांना वाचवा’ असे मला सांगितल्याचा दावा राय यांनी केला. तसेच आपल्या आगामी पुस्तकात यासंदर्भात गौप्यस्फोट करणार असल्याचेही राय म्हणाले आहेत. १५ सप्टेंबरला राय यांचे ‘नॉट जस्ट अॅन अकाऊंट’ हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.  पंतप्रधानपदाची जबाबदारी महत्त्वाची असते व मोठ्या प्रकरणांमध्ये कठोर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार त्यांच्याकडेच असतो. पण तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काही प्रकरणांमध्ये कठोर निर्णय घेतले नाही , याबाबत माझ्या पुस्तकात विश्लेषण करण्यात आले आहे, असे राय म्हणाले. याआधीही माजी कोळसा सचिव पी. सी. पारेख, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार संजय बारु, तसंच माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांनीही आपल्या पुस्तकात यूपीए सरकारविषयी अनेक गौप्यस्फोट केले होते.