जम्मू-काश्मीरमध्ये भाजप-पीडीपी सरकार स्थापन होताच मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी निवडणुकीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे केंद्र सरकार आणि भाजपची लोकसभेत सोमवारी कोंडी झाली. जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका शांततेत पार पडल्याचे श्रेय सईद यांनी पाकिस्तान, हुरियत आणि दहशतवाद्यांना दिल्याने विरोधकांनी सईद यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर सइद यांच्या मताशी आपण पूर्णत: असहमत आहोत, असे जाहीर करण्याची नामुष्की केंद्र सरकार आणि भाजपवर आली.
सईद यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रविवारी एका पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्याचा निधेष करणारा ठराव सभागृहाने मंजूर करावा, अशी आग्रही मागणी संतप्त विरोधी पक्षांनी शून्य प्रहराला सभागृहात केली. त्यामुळे सईद यांच्या विधानाशी केंद्र सरकार आणि भाजप पूर्णत: असहमत असल्याचे जाहीर करण्याची नामुष्की केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यावर ओढवली.
मात्र राजनाथसिंह यांच्या प्रतिसादामुळे समाधान न झालेल्या विरोधी पक्षांच्या सर्व सदस्यांनी सभात्याग केला. सदर प्रश्न उपस्थित करताना काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाळ म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या बाबत आपण चर्चा केली आहे, असे सईद यांनी जाहीर केले असून ही अत्यंत गंभीर बाब आहे.
सभागृहाने त्याचा निषेध केला पाहिजे आणि एक ठराव मंजूर केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
गृहमंत्री राजनाथसिंह यांनी या बाबत केलेल्या स्पष्टीकरणाने विरोधकांचे समाधान झाले नाही. मोदी यांनी या बाबत निवेदन करावे, अशी मागणी करून विरोधकांनी सभात्याग केला. या बाबत मोदी यांनीच निवेदन करणे योग्य आहे, केवळ मोदी हेच स्पष्टीकरण करू शकतात, असे काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
मात्र आपण पंतप्रधानांशी चर्चा केली असून त्यांच्या सहमतीनुसारच स्पष्टीकरण केले आहे, असे राजनाथसिंह यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर सईद यांनी या बाबत मोदी यांच्याशी चर्चा केली नव्हती, असेही गृहमंत्र्यांनी  सांगितले.

वक्तव्यावर सईद ठाम
जम्मू-काश्मीरमधील निवडणुका शांततेत पार पडल्याचे श्रेय पाकिस्तान, हुर्रियत आणि दहशतवाद्यांना देऊन नवा वाद निर्माण करणारे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी मात्र आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे. या प्रश्नावरून ज्यांनी गदारोळ माजविला आहे ते राईचा पहाड करीत आहेत, असे मुफ्ती मोहम्मद सईद यांनी म्हटले आहे. आपण जे वक्तव्य केले त्यावर ठाम आहोत, असे ते म्हणाले. मतपत्रिका हेच जनतेचे नशीब आहे. बंदुकीच्या गोळ्या किंवा बॉम्ब नाही याची पाकिस्तान आणि हुर्रियतला चांगलीच जाणीव झाली आहे, असे सईद म्हणाले.घटनेने जनतेला मतपत्रिका दिल्या असून त्यावर जनतेचा विश्वास आहे त्यामुळे पूर्वीप्रमाणे या वेळी सीमेपलीकडून निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला नाही, असे सईद म्हणाले.

राष्ट्रविरोधी वक्तव्याचा आरोप
काश्मिरातील निवडणुका शांततेत पार पडल्याचे श्रेय पाकिस्तान व हुर्रियतला देणारे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे वक्तव्य ‘राष्ट्रविरोधी’ असल्याचा आरोप काँग्रेसने राज्यसभेत केला. तथापि, याचे श्रेय सुरक्षा दले आणि नागरिकांनाच असल्याचे सांगून ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न सरकारच्यावतीने करण्यात आला.काँग्रेसचे शांताराम नाईक यांनी शून्य तासात हा मुद्दा उपस्थित केला.