माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस ‘उत्तम प्रशासन दिन’ म्हणून पाळला जाणार आहे व त्यादिवशी ख्रिसमसही असतो. त्यामुळे २५ डिसेंबरला शाळांना सुटी दिली जाणार नाही, हे वृत्त निराधार व चुकीचे असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी स्पष्ट केले. संसदेतही विविध राजकीय पक्षांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. तेथेही ख्रिसमसला शाळांना सुटी राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
काही लोक चुकीचे वार्ताकन मुद्दाम करतात व मुख्य मथळे (हेडलाइन)मिळवण्यासाठी  वाद निर्माण केले जातात, असे त्या म्हणाल्या. २५ डिसेंबरला ख्रिसमस आहे व तो साजरा केला जाईल, शाळा बंद राहतील असे त्यांनी संसदेबाहेर वार्ताहरांना सांगितले.
सदर वृत्तपत्राने दिलेली बातमी चुकीची व निराधार असल्याचे पत्रक आम्ही जारी केले आहे, असे त्या म्हणाल्या. आपल्याला स्पष्टीकरणे देण्यात गुंतवून ठेवण्यासाठी मुद्दाम अशा चुकीच्या पद्धतीने बातम्या दिल्या जातात असा आरोप त्यांनी केला. इराणी म्हणाल्या की, केंद्र सरकार चालवित असलेल्या केंद्रीय नवोदय विद्यालयात ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे पण ती ऐच्छिक आहे. ख्रिसमसच्या दिवशी शाळा बंद राहतील, निबंध स्पर्धा ऑनलाईन होईल.
नवोदय विद्यालय समितीने गेल्या आठवडय़ात जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवशी ‘उत्तम प्रशासन दिन’ साजरा केला जाणार असून जवाहर नेहरू विद्यालयांनी तो साजरा करावा. सीबीएसइनेही स्पर्धाचे आयोजन करायचे आहे व ते २४ व २५ डिसेंबर असे दोन दिवस करायचे असून या स्पर्धा सर्व शाळांना खुल्या आहेत. पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते बारावी या गटात निबंध स्पर्धा व एकपात्री प्रयोगाच्या प्रवेशिका पाठवायच्या आहेत. त्या २२ अधिसूचित भाषांपैकी कुठल्याही भाषेत किंवा इंग्रजीत असाव्यात, असे त्यामध्ये म्हटले होते.