केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा (मुख्य) परीक्षेचे निकाल रविवारी रात्री जाहीर झाले. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती येत्या २७ एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे. जाट समुदायासाठी आरक्षण रद्दबातल ठरविण्याच्या निकालाचा फेरविचार करावा, अशी विनंती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयास केल्यानंतर या परीक्षांचे निकाल प्रलंबित होते. मात्र, या मुद्दय़ाचा आयोगाने उल्लेख केलेला नाही. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी ही परीक्षा  घेण्यात येते. भारतीय प्रशासनाखेरीज भारतीय परराष्ट्र सेवा तसेच भारतीय पोलीस सेवेसाठीही या परीक्षेद्वारे उमेदवार निवडले जातात.