केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सी सॅट परीक्षेच्या मुद्दयावरून मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजावर परिणाम केला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ आणि घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज काहीवेळासाठी तहकूब करावे लागले.
सी सॅट २ परीक्षेतील इंग्लिश विषयासंदर्भातील गुण गुणवत्ता यादी करताना ग्राह्य धरले जाणार नाहीत, अशी घोषणा केंद्र सरकारने सोमवारी केली. त्यावरून तृणमूल कॉंग्रेस आणि डीएमकेच्या खासदारांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या विषयावर सखोल चर्चा व्हायला हवी, अशी मागणी डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांनी राज्यसभेत केली. तर तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनीदेखील सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली. लोकसभेतही प्रश्नोत्तराच्या तासावेळी सदस्यांनी हा विषय लावून धरल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
दरम्यान, सी सॅट परीक्षापद्धतीच रद्द करा, असा आग्रह धरीत यूपीएससीच्या परीक्षार्थींनी मंगळवारीही राजधानी नवी दिल्लीमध्ये आपले आंदोलन सुरूच ठेवले.