केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेच्या माध्यमातून केंद्र सरकार यंदाच्या वर्षी भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय विदेश सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलिस सेवासारख्या (आयपीएस) प्रतिष्ठित सेवांमध्ये फक्त ९८० अधिकाऱ्यांची भरती करणार आहे. मागील पाच वर्षातील ही सर्वात कमी संख्या आहे.
वर्ष २०१६च्या परीक्षेच्या माध्यमातून १,०७९ तर २०१५ मध्ये ११६४ पदांच्या भरतीच्या जाहिराती देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर २०१४ आणि २०१३ मध्ये क्रमश:१३६४ आणि १२२८ अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली होती. वर्ष २०१२ मध्ये जारी करण्यात आलेल्या यूपीएससी परीक्षेच्या अधिसूचनेत आयएएस, आयपीएससारख्या अखिल भारतीय सेवा तसेच केंद्रीय सेवांच्या भरतीसाठी एकूण १०९१ रिक्त जागांची जाहिरात देण्यात आली होती.

वर्ष २०१७मध्ये लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या ही ९८० इतकी आहे. यातील २७ पदे हे दिव्यांग श्रेणीसाठी आरक्षित असतील, असे जाहिरातीत म्हटले आहे. मागील पाच वर्षांतील ही सर्वात कमी संख्या आहे. लाखोंच्या संख्येने ही परीक्ष देण्यात येते. तीन टप्प्यातील परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आयएएस, आयपीएससह इतर नागरी सेवातील महत्वाची पदे भरण्यात येतात.
यावर्षीची पूर्व परीक्षा ही १८ जून रोजी होईल. तीन वर्षांनंतर यूपीएससीने जूनमध्ये पूर्व परीक्षेचे आयोजन केले आहे. वर्ष २०१६, २०१५ आणि २०१४ मध्ये पूर्व परीक्षा या ऑगस्ट महिन्यात घेण्यात आली होती, अशी माहिती यूपीएससीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ही पूर्व परीक्षा देण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही दि. १८ मार्चपर्यंत आहे.