केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेच्या गुणपत्रिका जाहीर करण्यात आल्या आहेत.
यूपीएससीकडून प्राथमिक, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत ही परीक्षा घेण्यात येते. त्यातून भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय विदेश सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) यासाठी उमेदवारांची निवड करण्यात येते.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून संकेतस्थळावर यशस्वी आणि अयशस्वी उमेदवारांचे गुणपत्रक जाहीर करण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गातील ४९९, ३१४ ओबीसी, १७६ एससी आणि ८९ एससी गटातील उमेदवार या परीक्षेत यशस्वी ठरले आहेत.
प्राथमिक परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका १७ जुलैपर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध असेल. २०१५ च्या नागरी सेवा परीक्षेत दिल्लीच्या टीना दाबी हिने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे, तर रेल्वे अधिकारी आणि मूळचा जम्मू-काश्मीरचा असलेल्या अतार आमीर उल शफी खान याने दुसरा क्रमांक मिळविला. भारतीय महसूल सेवेतील अधिकारी दिल्लीचा जसमीत सिंग संधू याने तिसरा क्रमांक मिळविला आहे. १७२ उमेदवार प्रतीक्षा यादीत आहेत.