येत्या आठवड्याभरात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) विद्यार्थ्यांचा विषय मार्गी लावू, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी दिले. यूपीएससीच्या आंदोलकांनी सोमवारी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेतली. या विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन यावेळी राहुल गांधी यांनी दिले.
यूपीएससी नागरी सेवा अभिक्षमता चाचणी (सीसॅट) परीक्षेला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गेल्या आठवड्यापासून राजधानी दिल्लीमध्ये आंदोलन छेडले आहे. सीसॅटच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप इंग्लिश माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी सोपे ठरावे, अशा पद्धतीने आखण्यात आल्याची तक्रार आंदोलकांनी केली आहे. सी-सॅट’ या चाचणीतील प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाला हिंदी भाषिक पट्टय़ातील आणि हिंदी माध्यमातूनच ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर आंदोलक आता दिल्लीमध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.