पुरोगामी देश म्हणवणाऱ्या भारताच्या प्रतिमेला धक्का देणारी घटना हरयाणामध्ये घडली आहे. कुटुंबात मुलगा नसल्याच्या रागातून आजीने तिच्या चार वर्षांच्या नातीच्या गुप्तांगाला चटके दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर हरयाणामध्ये संतापाची लाट उसळली असून क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या या महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी महिला संघटनांनी केली आहे.

‘हिंदूस्तान टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार सिरसा जिल्ह्यातील मोजूखेरा या गावात मजूरी करणारे एका दाम्पत्य राहत होते. या दाम्पत्याला तीन मुली असून सर्वात लहान मुलगी चार वर्षांची आहे. कुटुंबात मुलगा नसल्याने ५० वर्षांची आजी नाराज होती. कुटुंबात मुलगा हवाच यासाठी त्या महिलेने मुलगा आणि सुनेकडे तगादाही लावला होता. १० दिवसांपूर्वी दाम्पत्याची चार वर्षांची सर्वात लहान मुलगी घराबाहेर खेळत होती. नातीला खेळताना बघून आजीचा पारा चढला आणि तिने संतापाच्या भरात गरम चिमट्याने तिच्या गुप्तांगावर चटके दिले. सुरुवातीला दाम्पत्यानेही हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना समजली. त्यांनी बाल सुरक्षा समितीच्या माध्यमातून पीडित मुलीच्या आईवडिलांना नोटीस पाठवली. मात्र त्यांनी नोटीशीला उत्तर न दिल्याने शेवटी सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या एका पथकाने त्याच्या घरावर धडक दिली. पीडित चिमुरडीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून सखोल तपासानंतरच पुढील कारवाई करु असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस तपास करुन पीडित मुलीच्या आजीला शिक्षा देतील अशी आशा सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.