नवाझ शरीफ यांचा नवा शोध

उरी हल्ला ही काश्मीरमधील परिस्थितीची प्रतिक्रिया असू शकते, असा एक नवाच ‘सिद्धांत’ मांडून त्या घटनेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी चालविला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेनंतर न्यू यॉर्कहून परताना ते शुक्रवारी लंडन येथे थांबले होते. तेथे पत्रकारांशी बोलताना शरीफ यांनी उरीमधील दहशतवादी हल्ल्याचा संबंध काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीशी जोडण्याचा प्रयत्न केला. ‘तेथे मारल्या गेलेल्या किंवा आंधळ्या झालेल्या व्यक्तींचे आप्त, त्यांचे निकटवर्ती शोकसंतप्त झाले आहेत. उरी हल्ला ही गेल्या दोन महिन्यांपासून तेथे सुरू असलेल्या अत्याचारांची प्रतिक्रिया असू शकते,’ असे ते म्हणाले.

कोणत्याही पुराव्यांशिवाय भारत पाकिस्तनला दोष देत असून, हा बेजबाबदारपणा आहे, अशी टीका करतानाच, शरीफ यांनी पुन्हा एकदा जगाचे लक्ष काश्मीर प्रश्नाकडे वळविण्याचाही प्रयत्न केला. ‘काश्मीरमध्ये आतापर्यंत १०८ लोक मारले गेले आहेत. १५०हून अधिक आंधळे, तर हजारो जखमी झाले आहेत. सगळ्या जगाला तेथील भारतीय अत्याचारांची माहिती आहे,’ असे ते म्हणाले.

दरम्यान, पाकिस्तानचे अंतर्गत व्यवस्थामंत्री निसार अली खान यांनीही शनिवारी भारतावरील दोषारोपाचा राग आळवला. ‘उरी हल्ल्याबाबत भारताकडे काहीच पुरावे नाहीत. अशा परिस्थितीत पाकिस्तान त्याची चौकशी कशी करू शकेल’, असा प्रश्न त्यांनी केला.

मॅककेन-झरदारी चर्चा

इस्लामाबाद : अमेरिकेतील प्रभावशाली सिनेटर जॉन मॅककेन यांनी पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सह-अध्यक्ष असीफ अली झरदारी यांच्याशी दूरध्वनीवरून भारत-पाक तणावाबाबत चर्चा केली. झरदारी यांच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. मॅककेन हे २००८च्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होते. या चर्चेत झरदारी यांनी भारतावर दोषारोप केले.

काश्मिरी पंडितांची स्मार्ट शहराची मागणी

जम्मू : काश्मीरमधील पंडित आपल्याच देशात निर्वासिताचे आयुष्य जगत असून, त्यांच्यासाठी केंद्र सरकारने काश्मीरमध्ये स्मार्ट शहर तयार करावे, अशी मागणी ‘वायएआयकेएस’ या काश्मिरी पंडितांच्या संघटनेने शनिवारी केली. मोदी सरकारने अलीकडेच स्मार्ट शहरांची तिसरी यादी जाहीर केली. त्यात काश्मिरी पंडितांसाठीच्या शहराचा समावेश असेल, अशी आमची अपेक्षा होती. मात्र गेल्या २६ वर्षांपासून आपल्याच देशात निर्वासित म्हणून जगत असलेल्या आणि दहशतवादाची सर्वाधिक झळ सोसत असलेल्या या समुदायाकडे मोदी सरकारने पुन्हा एकदा दुर्लक्ष केले, असे या संघटनेचे अध्यक्ष राम के भट म्हणाले.

भारतीय चित्रपटांवर बंदीची मागणी

लाहोर : काश्मीर प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत पाकिस्तानात भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका शनिवारी लाहोर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. ‘भारतीय फौजा काश्मीरमध्ये अत्याचार करीत असताना पाकिस्तान सरकार मात्र भारतीय चित्रपट दाखविण्यास परवानगी देत आहे. यामुळे केवळ काश्मिरींच्याच नव्हे, तर पाकिस्तानी नागरिकांच्याही भावना दुखावल्या जात आहेत,’ असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. अझहर सादिक असे याचिकार्त्यांचे नाव असून तो वकील आहे. या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख पुढील आठवडय़ात ठरणार आहे.