सुरक्षेत उणीव राहिल्यामुळे उरी हल्ल्याला सामोरे जावे लागले, या केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या काही दिवसांपूर्वीच्या विधानाचे पडसाद शनिवारी उमटले. संरक्षण मंत्रालयलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उरी दहशतवादी हल्ल्याचा तपास पूर्ण होईपर्यंत उरी कॅम्पच्या ब्रिगेड कमांडरची बदली करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रायलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उरी दहशतवादी हल्ल्याचा तपास पूर्ण होईपर्यंत उरी कॅम्पचे ब्रिगेड कमांडर के. सोमाशंकर बदली करण्यात आली आहे. दरम्यान, उरी कॅम्पच्या नव्या ब्रिगेड कमांडरपदी एस. पी. अहलावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी मनोहर पर्रिकर यांनी उरी येथील दहशतवादी हल्ल्यामागे सुरक्षेतील काही त्रुटी कारणीभूत असल्याची कबुली दिली होती. आमच्याकडून निश्चित काहीतरी चुकले आहे, पण शोध घेऊन चूक सुधारली जाईल. अशा हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ दिली जाणार नाही, असे पर्रिकर यांनी पत्रकारांना सांगितले होते. उरीतील लष्करी तळाभोवतालचे तारांचे कुंपण दोन ठिकाणी तोडून दहशतवादी दोन गटांत घुसले आणि तब्बल दीडशे मीटरपर्यंत त्यांना कोणी अटकावही केला नाही. त्यामुळे लष्करी तळावरच्या सुरक्षा व्यवस्थेतील उणीवा समोर आल्या होत्या. या गोष्टी उघड झाल्याने सरकारवर जोरदार आगपाखड सुरू आहे. यापूर्वीच्या पठाणकोट हल्ल्याच्यावेळीही सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी राहिल्याचे समोर आले होते.
दरम्यान, या हल्ल्यामागे नेमकी कोणती चूक कारणीभूत होती, याबाबत काही बोलायला मात्र पर्रिकर यांनी नकार दिला होता. ही अतिशय संवेदनशील बाब आहे, असे ते म्हणाले. मात्र, शून्य टक्के चूक आणि शंभर टक्के अचूकता, हे माझे जीवन तत्त्वज्ञान आहे, असे सूचक विधानही पर्रिकर यांनी केले होते.
दरम्यान, भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून उरी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानकडून प्रतिहल्ला होताना दिसत आहे. जम्मू काश्मीरमध्ये सीमारेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होताना दिसत आहे. अखनूर येथे शनिवारी पहाटे चारच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने भारतावर उखळी तोफांचा मारा सुरू केला. अजूनही गोळीबार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या ५६ तासांत चार वेळा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर भारताने सीमारेषेवरील गावे त्वरीत रिकामी केली होती. सीमावर्ती भागातील शाळांना सुटी देण्यात आली आहे. भारतीय लष्कराने सुटीवर असलेल्या जवानांना माघारी बोलावले आहे.