गेल्यावर्षी जम्मू-काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणला होता. पुन्हा एकदा असाच हल्ला घडवून आणण्याचा कट सुरक्षारक्षकांनी उधळून लावला आहे. यावेळी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. एखाद्या युद्धाच्या तयारीसाठी करतात तसा हा मोठा साठा आहे. अद्यापही या भागात लष्कराकडून शोध मोहीम सुरुच आहे. उरी ब्रिगेडचे डेप्युटी कमांडर हरप्रीतसिंह यांनी ही माहिती दिली.

कलगई येथे लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम राबवल्यानंतर या भागात दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षारक्षकांवर गोळीबार सुरु केला. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यात ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. यामध्ये एक जवान गंभीररित्या जखमी झाला. या गोळीबारात तीन नागरिकही जखमी झाले आहेत.

सुरक्षा रक्षकांनी AK 47 रायफल्स, मॅगझिन्स आणि हातबॉम्ब तसेच इतर साहित्य असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. अद्यापही या भागातील शोध मोहीम सुरु असून हा संपूर्ण भाग पिंजून काढण्याची योजना आखल्याचे हरप्रीत सिंह यांनी सांगितले.

गेल्या वर्षी १८ सप्टेंबर रोजी उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या हल्ल्यात १९ जवान शहीद झाले होते. तर अनेक जवान जखमी झाले होते.

[jwplayer EG5LKxCn]