उत्तर कोरियाने लघु पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचे अमेरिकन लष्कराने म्हटले आहे. दक्षिण कोरिया आणि जपान यांनी उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीचा निषेध केला आहे. अमेरिकेच्या लष्करी तळापर्यंत पोहोचू शकणारी अण्वस्त्रे तयार करण्याच्या दृष्टीने उत्तर कोरियाचे प्रयत्न सुरु आहेत.

स्थानिक वेळेनुसार पहाटे ५ वाजून ३९ मिनिटांनी उत्तर कोरियाने लघु पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. कांगवन प्रांतातील वॉनसन भागात ही चाचणी घेण्यात आल्याचे दक्षिण कोरियाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. उत्तर कोरियाकडून चाचणी घेण्यात आलेले क्षेपणास्त्र स्कड मालिकेतील असल्याचा अंदाज दक्षिण कोरियाने प्रसिद्धीपत्रकात व्यक्त केला आहे.

‘उत्तर कोरियाकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने जवळपास ४५० किलोमीटरचा टप्पा पार केला. दक्षिण कोरिया आणि अमेरिका संपूर्ण स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. मिळालेल्या माहितीवरुन परिस्थितीचे विश्लेषण केले जात आहे. आमच्या लष्कराकडून उत्तर कोरियन लष्कराच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. दक्षिण कोरियन लष्कर कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे,’ अशी माहिती दक्षिण कोरियन सरकारने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.

उत्तर कोरियाने डागलेले क्षेपणास्त्र जवळपास सहा तास हवेत उड्डाण करत होते, अशी माहिती अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर उत्तर कोरियाने डागलेले क्षेपणास्त्र आपल्या इकॉनॉमिक झोनमध्ये पडल्याचा दावा जपानने केला आहे. जपानजवळील समुद्रात २०० नॉटिकल मैलावर क्षेपणास्त्र पडल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘उत्तर कोरियाची कृती अडचणी वाढवणारी आहे. यामुळे विमान आणि जहाजांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. यामुळे संयुक्त राष्ट्राच्या नियमांचे उल्लंघन होते. उत्तर कोरियाकडून वारंवार घडणारी आगळीक सहन करण्यासारखी नाही,’ असे जपानचे कॅबिनेट सचिव योशीहिदे सुगा यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी उत्तर कोरियाचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे.