भारत- पाकिस्तान सीमेवर तणाव वाढल्यामुळे सुरू असलेल्या घडामोडींचे आपण बारकाईने निरीक्षण करत असल्याचे अमेरिकेने म्हटले असून, दोन्ही देशांनी ‘द्विपक्षीय स्तरावर’ या परिस्थितीतून मार्ग काढावा असे आवाहन केले आहे.
दोन्ही देशांमधील तणाव कमी व्हावा आणि त्यांनी परस्परांसोबत यातून मार्ग काढावा अशी आमची इच्छा असल्याचे स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते जॉन किरबी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार जो हिंसाचार सुरू आहे, त्यामुळे सीमेवरील तसेच त्या क्षेत्रातील सुरक्षेची स्थिती नक्कीच बिघडते. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी हे या परिस्थितीवचे काळजीपूर्वक अवलोकन करत आहेत, असे किरबी म्हणाले.
जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक शस्त्रसंधीच्या घटनांची मालिका सुरू असून, पाकिस्तानने गेले दोन भारतीय हद्दीत तोफांचा मारा सुरू ठेवला आहे. भारतानेही त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले असून दोन्ही देशांनी आपल्याकडील लोक मारले गेल्याचा दावा केला आहे.
भारत व पाकिस्तानातील अलीकडच्या वाग्युद्धानंतर केरी यांनी गेल्या महिन्यात पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना दूरध्वनी करून, भारतासोबतचा तणाव वाढल्याबद्दल ‘तीव्र चिंता’ व्यक्त केली होती. दोन्ही शेजाऱ्यांमध्ये कुठलेही चुकीचे आकलन असू नये, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली होती.