चीनमधील काही माता अमेरिकेत येऊन तेथील विशेष प्रसूतिगृहात बालकांना जन्म देत असून त्यांना मग अमेरिकेचे नागरिकत्व मिळते. त्यामुळे तेथील अशा प्रसूतिगृहांवर छापे टाकण्यात आले आहे. या सगळ्या प्रकाराला मॅटर्निटी टुरिझम असे म्हटले जाते. अमेरिकेत फारसा अर्थबोध होणार नाही अशा पद्धतीने जाहिराती देऊन चिनी महिलांना तेथील प्रसूतिगृहांकडे आकर्षित केले जात आहे.
 संघराज्य अंतर्गत सुरक्षा खात्याने प्रथमच मॅटर्निटी टुरिझमच्या माध्यमातून चालणाऱ्या या केंद्रांवर छापे टाकले असून त्यातील तीन टोळ्या उघड केल्या आहेत. महिला अमेरिकेत येऊ शकतात पण त्या व्हिसा अर्जात गर्भवती असल्याबाबत खोटे लिहू शकत नाहीत. अमेरिकाच नव्हे तर अनेक देशात हा मॅटर्निटी टुरिझमचा प्रकार चालतो.
अधिकाऱ्यांनी सांगितले, की अमेरिकेत कॅलिफोर्निया येथे चीनमधील श्रीमंत स्त्रिया येतात व मुले जन्माला घालतात. या कारणास्तव चीनमधून किती महिला अमेरिकेत आल्या हे समजू शकलेले नाही. ऑरेंज परगण्यातील आयर्विन येथे सकाळी छापे टाकण्यात आले. त्यात गर्भवती महिलांचे अन्न, प्रवास व इतर कारणांसाठी ५० हजार डॉलर आकारले जात असल्याचे समजते. तेथील एका संकुलात छापा टाकला. चौकशीकर्त्यांनी सांगितले, की येथे महिलांना त्यांच्या प्रवास कारणाबाबत खोटे सांगण्यास भाग पाडले जाते व पर्यटन व्हिसा घेतला जातो. त्यांना सोशल सिक्युरिटी क्रमांक दिला जातो व त्यांच्या मुलांना चीनमधून परतण्यापूर्वी अमेरिकी पासपोर्टही करून दिला जातो.