१९८४च्या शीखविरोधी दंगलीवरून एका शीख संघटनेने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका अमेरिकी न्यायालयाने फेटाळून लावली. सोनिया गांधी यांच्यावर केलेले आरोप तथ्यहीन व बिनबुडाचे आहेत, असे न्यायालयाने सांगितले. मात्र भविष्यात आपल्याविरोधात अशा प्रकारची याचिका करण्यात येऊ नये, ही सोनियांची मागणी मात्र न्यायालयाने फेटाळली आहे.
‘शीख्स फॉर जस्टिस’ या संघटनेने ही याचिका केली होती. शीख दंगलीत सहभागी असलेल्यांना सोनिया गांधी यांनी दिलेल्या संरक्षणात्मक ‘वागणुकी’मुळे शीख समुदायाला खूपच मानसिक त्रास झाल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. मात्र न्यूयॉर्क जिल्हा न्यायाधीश ब्रायन कोगन यांनी ही याचिका रद्दबातल ठरविली. ही याचिका बिनबुडाची असल्याने ती फेटाळण्यात यावी, अशी मागणी सोनिया गांधी यांचे वकील रवी बात्रा यांनी केली होती.
भविष्यात आपल्याविरोधात अशा प्रकारची कोणतीही याचिका दाखल करण्याची परवानगी शीख संघटनांना देण्यात येऊ नये, अशी मागणी सोनिया गांधी यांच्या वतीने बात्रा यांनी केली होती. मात्र त्यास न्यायालयाने नकार दिला. असे असले तरी शीख संघटनेची याचिका फेटाळल्याने योग्य निवाडा झाल्याची प्रतिक्रिया बात्रा यांनी दिली.