पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या पहिल्यावहिल्या अमेरिकावारीसाठी गेलेल्या नरेंद्र मोदींविरुद्ध अमेरिकी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आल्यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००२ साली झालेल्या दंगलींप्रकरणी मोदींवर आरोप ठेवत न्यूयॉर्कमधील फेडरल कोर्टाकडून शुक्रवारी हे समन्स जारी करण्यात आले. एलियन टॉर्ट क्लेम्स अॅक्ट(एटीसीए) आणि टॉर्चर प्रोटेक्शन व्हिक्टम्स अॅक्ट(टीव्हीपीए) या दोन कायद्यांतर्गत अमेरिकी न्यायकेंद्र, मानवाधिकार संस्था आणि गुजरातमधील हिंसाचारातून बचावलेल्या दोन व्यक्तींनी न्यायालयात मोदींविरुद्ध खटला दाखल केला होता. मोदींविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या २८ पानी आरोपपत्रात त्यांच्यावर गुजरात दंगलीत मुस्लिम समाजाच्या व्यक्तींना त्रास आणि यातना देणे, मानवी आणि न्यायालयीन कायद्याचे उल्लंघन केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी शुक्रवारी न्युयॉर्कमध्ये दाखल होत असून, या पार्श्वभूमीवर काही भारतविरोधी संघटनांकडूनही त्यांच्याविरोधात निदर्शने केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, याविषयी बोलताना केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी अमेरिकी न्यायलयाकडून पंतप्रधानांना बजावण्यात आलेले समन्स तपासल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगितले.