अमेरिकेचे संरक्षणमंत्री चक हेगेल यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत काम करण्याचे त्यांनी मान्य केले आहे.  ‘अनेक आठवडय़ांच्या चर्चेनंतर’ हेगेल यांनी राजीनामा दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा देणारे हेगेल हे ओबामा मंत्रिमंडळातील तिसरे मंत्री ठरले आहेत.
इराकमधील ‘इस्लामिक स्टेट’च्या कारवायांमुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेले पेचप्रसंग हाताळण्यात हेगेल यांना आलेल्या अपयशामुळे अध्यक्ष बराक ओबामा हे त्यांच्यावर नाराज होते, असे वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ ने सर्वप्रथम दिले होते. याखेरीज, सिनेटमधील डेमोक्रॅटिक पक्षाचे घटलेले वर्चस्वही हेगेल यांच्या राजीनाम्यास कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. ओबामा यांच्या राष्ट्रीय सुरक्षा तुकडीमध्ये ६८ वर्षीय हेगेल हे एकमेव रिपब्लिकन सदस्य राहिले आहेत.
हेगेल यांनी  अन्य रिपब्लिकन सद्स्य रॉबर्ट एम.गेट्स यांच्याकडून २०१३ मध्ये संरक्षणपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्या राजीनाम्याची औपचारिक घोषणा लवकरच ओबामा यांच्याकडून करण्यात येईल. हेगेल हे भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याशीही या आठवडय़ात चर्चा करणार होते. परंतु तपशील ठरविता न आल्यामुळे उभयतांमध्ये चर्चा झाली नाही.