अध्यक्षपदी निवडून आल्यास आपण अफगाणिस्तानातील अमेरिकन सैन्याच्या उपस्थितीचे मूल्यमापन करू, असे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी लढत देणाऱ्या हिलरी क्लिंटन यांनी म्हटले आहे. या युद्धग्रस्त देशात इस्लामिक स्टेटने पाय रोवल्यामुळे येथे अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या देशाला यापुढे किती मदतीची गरज आहे, याबद्दल मी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारेन त्यावेळच्या परिस्थितीच्या आधारे मला मूल्यमापन करावे लागेल. कारण हा केवळ तालिबानचा प्रश्न नाही, तर आयसिसशी संलग्न असल्याचा दावा करणाऱ्या लढवय्यांच्या संघटनांचाही तेथे उदय झाला आहे, याकडे क्लिंटन यांनी लक्ष वेधले.
गेल्या वर्षीच्या अखेपर्यंत आपण अफगाणिस्तानातील अमेरिकी सैन्याची संख्या साडेपाच हजारापर्यंत कमी करू आणि नंतर २०१६च्या अखेपर्यंत ही संख्या १ हजारावर आणली जाईल असे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले होते. मात्र, इतक्या जलदीने सैन्य मागे घेण्याइतकी तेथील परिस्थिती सुधारली नसल्याचे सांगून त्यांनी या आश्वासनापासून माघार घेतली होती.
सीरिया व लिबियामध्ये अरब व कुर्दिश सैनिकांना पाठिंबा देण्याचे ओबामा प्रशासनाचे धोरण योग्य असल्याचे सांगतानाच, या देशांमध्ये अमेरिकी सैन्य पाठवण्याची शक्यता मात्र क्लिंटन यांनी फेटाळून लावली.
या वादविवादात सहभागी झालेले त्यांचे प्रतिस्पर्धी बर्नी सँडर्स यांनी मात्र, अफगाणिस्तानातील अमेरिकेचे सैन्य एका रात्रीत परत बोलावणे शक्य नसल्याचे प्रतिपादन केले. समजा आम्ही असे केले, तर ते तालिबान किंवा इतर दहशतवादी संघटनांना त्या देशावर पुन्हा ताबा मिळवू दिल्यासारखे होईल असे ते म्हणाले.
येत्या मंगळवारी न्यू हॅम्पशायर येथे होऊ घातलेल्या देशातील पहिल्या ‘प्रायमरी’ पूर्वीचा हा अखेरचा वादविवाद होता.
दरम्यान हिलरी क्लिटंन व बेर्नी सँडर्स यांनी आमने सामने आल्यानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. हिलरी क्लिंटन यांनी राजकीय देणग्या घेतल्या असून त्यांच्यावर हे गट केव्हाही प्रभाव टाकू शकतात, अशी टीका सँडर्स यांनी केली. अप्रत्यक्षपणे हिलरी या विकाऊ असल्याचा आरोप सँडर्स यांनी केला. न्यूहॅम्पशायर येथील लढतीच्या आधी हे दोन उमेदवार एमएसएनबीसीच्या चर्चेत सामोरे आले होते.