अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांच्याकडून पराभूत झाल्यास तो निकाल मान्य असेल की नाही याबद्दल बोलण्यास डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला. मी वेळ आल्यावर तुम्हाला त्याबद्दल सांगेन. मात्र, तोपर्यंत मी तुमची उत्सुकता कायम ठेवणार आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले. ते गुरूवारी झालेल्या अंतिम अध्यक्षीय निवडणूक चर्चेत बोलत होते. नेवाडातील लास वेगास विद्यापीठात डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्‍लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाच्या ट्रम्प यांच्यात तिसरी आणि अंतिम अध्यक्षीय निवडणूक चर्चा पार पडली. यावेळी हिलरी यांनी ट्रम्प यांचा हेकेखोरपणा भयंकर असल्याचे म्हटले. तत्पूर्वी अध्यक्षीय चर्चेत हिलरी यांनी पुतीन यांच्याशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांवरून ट्रम्प यांच्यावर हल्ला चढवला. डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकी सुरक्षा यंत्रणा आणि लष्करापेक्षा पुतीन यांच्यावर विश्वास आहे. पुतीन यांना व्हाइट हाऊसमध्ये बोलका बाहुला हवा असल्याने त्यांना मी आवडत नसेल, असे हिलरी यांनी म्हटले. हिलरींच्या या आरोपांनी प्रत्युत्तर देताना ट्रम्प यांनी म्हटले की, पुतीन हिलरी यांच्यापेक्षा हुशार असल्याने त्यांना ते आवडत नाहीत.
दरम्यान, या चर्चेत ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या आर्थिक धोरणांवरही टीका केली. मी काही उच्च पदस्थ भारतीयांना भेटलो. त्यांची अर्थव्यवस्था ८ टक्क्यांनी वाढत आहे. मात्र, चीन आणि व्हिएतनामधून अनेक वस्तू अमेरिकेमध्ये येताना दिसतायत, आपण कसलेच उत्पादन करत नाही . आपला देश आर्थिक बाबतीमध्ये थंडावला आहे, नोकऱ्यांचा आकडा वाढत नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. मात्र, हिलरी यांनी ट्रम्प यांचे हे आरोप फेटाळून लावले. ओबामांच्या धोरणांमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था सावरली. आपण संकटातून बाहेर पडलोय पण त्यापासून पळ काढला नाही, असे हिलरी यांनी स्पष्ट केले.