सिक्किम सेक्टरच्या डोक्लाममधील भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या संघर्षाची परिणती युद्धात होऊ शकते, असा अंदाज अमेरिकेतील एका तज्ज्ञाने व्यक्त केला आहे. चीन आणि भारतात युद्धाचा भडका उडू शकतो, असे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण परिषदेतील तज्ज्ञ जेफ एम. स्मिथ यांनी म्हटले आहे. न्यूयॉर्क टाईम्सने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

डोक्लाम प्रांतात भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या तणातणीचे रुपांतर युद्धात होऊ शकते का, असा प्रश्न न्यूयॉर्क टाईम्सकडून जेफ एम. स्मिथ यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला ‘हो, असे होऊ शकते आणि हे मी पूर्ण गांभीर्याने बोलत आहे,’ असे उत्तर स्मिथ यांनी दिले. ‘डोक्लाममध्ये दोन्ही देश आपल्या भूमिकेवर अडून बसले आहेत. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांकडून त्यांच्या भूमिकेत कोणताही बदल केला जात नसल्याने परिस्थिती निवळणे कठीण बनले आहे. १९६२ मध्ये भारत आणि चीनमध्ये सीमावादावरुन युद्ध झाले होते. दोन्ही देशांमधील सध्याचा वादामागेदेखील सीमेवरील तणाव हेच प्रमुख कारण असल्याने युद्धाची शक्यता नाकारात येत नाही,’ असेही त्यांनी म्हटले.

भारत, चीन आणि भूतानच्या सीमेवरील डोक्लाम या वादग्रस्त भागात चिनी लष्कराकडून रस्त्याची निर्मिती केली जाते आहे. चिनी लष्कराच्या या रस्ते निर्मितीला भारताने विरोध केला आहे. डोक्लाममधील वादग्रस्त भागावर चीन आणि भूतानने दावा केला आहे. या भागातून सैन्य मागे घेण्यासाठी चीनकडून वारंवार भारतावर दबाव टाकण्यात येतो आहे. मात्र भारतीय लष्कराचे जवान या भागात पाय रोवून उभे आहेत. भौगोलिक स्थानाच्या दृष्टीने डोक्लामचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने भारतीय लष्कराने या भागातून मागे हटण्यास नकार दिला आहे.

काही दिवसांपूर्वी चीनच्या संरक्षण मंत्रालयाकडून भारतीय सैन्याला थेट इशारा देण्यात आला होता. ‘भारताने डोक्लाममधील सैन्य मागे घेऊन आपली चूक सुधारावी’, असे चिनी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वु क्यान यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले होते. ‘डोक्लाममध्ये चिनी लष्कराने पावले उचलली असून सैन्याचा युद्धाभ्यास सुरुच राहिल,’ असेही त्यांनी म्हटले. ‘भारताने चूक सुधारण्यासाठी योग्य पावले उचलावीत आणि परिस्थिती चिघळवणाऱ्या कारवाया बंद कराव्यात,’ असा फुकटचा सल्लादेखील क्यान यांनी दिला होता.