थेट अमेरिकेपर्यंत मारा करू शकणाऱ्या आंतरखंडीय क्षेपणास्राची चाचणी चीनने केली आहे. अण्वस्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या आणि आठ हजार किमीपर्यंत मारा करू शकणाऱ्या या क्षेपणास्र चाचणीची छायाचित्रे चीनने प्रथमच प्रसारित केली आहे. चीनच्या या चाचणीने अमेरिकेची डोकेदुखी वाढली आहे.
चिनी सैनिक डोंगफेग -३१ हे क्षेपणास्राची चाचणी करतानाचे छायाचित्र सोहु.कॉम या संकेतस्थळावर झळकत असून या क्षेपणास्राच्या टप्प्यात अमेरिकेतील अनेक शहरे येत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केल्याचे मंगळवारी सरकारी वर्तमानपत्रात म्हटले आहे. मात्र या चाचणीची छायाचित्रे सरकारच्या मालकीच्या वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर टाकली नसल्याचे आढळून आले.
जपानच्या सीमावादाची झालर
दरम्यान, दक्षिण चिनी समुद्रातील शेजारी राष्ट्रांशी खासकरून जपानबरोबर सीमावादावरून चीनचा वाद आहे, तर जपानचा अमेरिकेबरोबर सुरक्षा करार आहे. त्यामुळे चिनी समुद्रातील तणावाच्या पाश्र्वभूमीवर अमेरिकेपर्यंत मारा करू शकणाऱ्या आंतरखंडीय क्षेपणास्राची चाचणी चीनने केल्यामुळे अमेरिकेची डोकेदुखी वाढली आहे.