कॉम्प्युटर यंत्रणा हॅक करण्याच्या माध्यमातून सायबर हेरगिरी करून अमेरिकेला लक्ष्य केले जात असल्याचा अहवाल अमेरिकेतील गुप्तहेर संस्थांनी दिला आहे. अमेरिकेचे आर्थिक नुकसान करण्याच्या हेतूने चीनकडून ही हेरगिरी केली जात असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने यासंदर्भात सविस्तर वृतांत लिहिला आहे.
गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेतील महत्त्वाचे उद्योगपती आणि संस्था यांच्या कॉम्प्युटर यंत्रणा हॅक करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. या हॅकिंगमागे सायबर हेरगिरीचा हेतू असून, चीनमधील सायबरचाचे हा ‘उद्योग’ करीत असल्याचा गुप्तचर संस्थांचा दावा आहे. ऊर्जा, वित्तपुरवठा, माहिती-तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, अंतराळ या क्षेत्रातील माहिती चोरण्यासाठी हॅकिंग करण्याचे प्रमाण गेल्या पाच वर्षांमध्ये वाढले आहे, असे या वृतांतात म्हटले आहे.
सायबर हेरगिरीमुळे अमेरिकेला किती मोठा आर्थिक फटका बसेल, याबद्दल गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिलेली नाही. मात्र, बाहेरील तज्ज्ञांच्यामते हा फटका अब्जावधी डॉलरचा असू शकतो.
सायबर हेरगिरी हा अमेरिकेसाठी मागील काही वर्षांपासून चिंतेचा विषय आहे. मात्र, गेल्या काही महिन्यातील हॅकिंगच्या वाढत्या घटनांमुळे या स्वरुपाची हेरगिरी अमेरिकेच्या आर्थिक धोरणांसाठी मोठे आव्हान ठऱणार आहे. अमेरिकी सरकारची आणि उद्योगपतींची गोपनीय माहिती हॅकिंगच्या माध्यमातून चोरली जाऊ नये, यासाठी आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे प्रशासन उपाय शोधत आहे. तज्ज्ञांच्या मते, चीनकडून होणाऱया सायबर हेरगिरीविरुद्ध आवाज उठविणे, चीनच्या राजकीय दूताला मायदेशी परत पाठविणे, चीनी नागरिकांना व्हिसा न देणे आणि जागतिक व्यापार संघटनेकडे याविरोधात रितसर तक्रार नोंदविणे, हे पर्याय अमेरिकेकडे उपलब्ध आहेत.