युद्धग्रस्त अफगाणिस्तानात भारतीय मोहिमांसह देशात अनेक हल्ले घडवून आणल्याचा आरोप असलेल्या पाकिस्तानस्थित ‘हक्कानी नेटवर्क’च्या पाच प्रमुख नेत्यांची माहिती देणाऱ्यास ३० दशलक्ष डॉलरचे इनाम अमेरिकेने जाहीर केले आहे. कमांडर अझीझ हक्कानी, खलिल अल रहमान हक्कानी, याह्य़ा हक्कानी आणि अब्दुल रौफ झाकीर हे चार जण ‘हक्कानी नेटवर्क’चे काम पाहतात. या चौघांच्या तळाची माहिती देणाऱ्यास अमेरिकन परराष्ट्र खात्याने प्रत्येकी ५० लाख डॉलर इनाम जाहीर केले आहे. याशिवाय या गटाचा नेता सिराजुद्दीन हक्कानी याची माहिती देणाऱ्यास ५० लाख डॉलर इतके इनाम जाहीर केले होते, ते वाढवून एक कोटी डॉलर इतके करण्यात आले आहे. हक्कानी नेटवर्क हे तालिबानशी संलग्न आहे. २०१२ साली अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी हक्कानी नेटवर्कला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले होते.
हक्कानी नेटवर्कचा संस्थापक जलालुद्दीन हक्कानी याचा मुलगा सिराजुद्दीन हा सध्या या नेटवर्कचा म्होरक्या आहे. २००८ मध्ये अफगाणिस्तानमध्ये काबूल शहरातील सेरेना हॉटेलमध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी हक्कानी नेटवर्कने घेतली होती. यात अमेरिकन नागरिकासह अन्य पाच जण ठार झाले होते.