अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका भेटीसाठी आमंत्रित केले आहे. वर्षाच्या शेवटी मोदींना अमेरिका दौऱ्यासाठी आमंत्रित केल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यांमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट प्रत्यक्ष भेट होण्याची शक्यता आहे.

सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा झाली होती. विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशासाठी ट्रम्प यांनी मोदींचे अभिनंदन केले होते. मंगळवारी रात्री व्हाईट हाऊसने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दोन्ही नेत्यांमधील चर्चेविषयी माहिती दिली. ‘ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोनवरुन अभिनंदन केले. भारतातील आर्थिक धोरणासाठी त्यांनी मोदींचे समर्थन केले. तसेच भारतीयांविषयी आदर असल्याचे ट्रम्प यांनी मोदींना सांगितल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. वर्षाच्या शेवटी मोदींनी अमेरिका दौऱ्यावर यावे असेही ट्रम्प यांनी नमूद केले. मोदी अमेरिकेत कधी जाणार याविषयी केंद्र सरकारकडून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

मोदी आणि ट्रम्प यांच्यात यापूर्वीही फोनवर चर्चा झाली होती. जानेवारीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. अमेरिकेसाठी भारत हाच खरा मित्र असून जागतिक पातळीवरही विविध मुद्द्यांवर दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करतील असे ट्रम्प यांनी म्हटले होते. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांचे अभिनंदन करणा-या पहिल्या पाच नेत्यांमध्ये मोदींचा समावेश होता. निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही ट्रम्प यांनी भारताशी संबंध सुधारण्यावर भर देऊ असे म्हटले होते. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी यापूर्वी मोदींच्या कार्यशैलीचेही कौतुक केले होते. आता वर्षाच्या शेवटी होणाऱ्या या दोन्ही नेत्यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]