अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांच्यात मंगळवारी झालेल्या अध्यक्षीय चर्चेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी पहाटे ही अध्यक्षीय चर्चा पार पडली. यावेळी हिलरी क्लिंटन आणि ट्रम्प यांनी देशाची अर्थव्यवस्था आणि नवीन रोजगारांच्या निर्मितीच्या मुद्द्यांवर आपापली भूमिका स्पष्ट केली.
अमेरिकेच्या तिजोरीचा वापर चीनच्या पुर्नबांधणीसाठी होत असल्याचा आरोप यावेळी ट्रम्प यांनी केला. आपल्या देशातील रोजगार बाहेर जात आहेत. मेक्सिकोसह अनेक देशांना याचा फायदा होत आहे. वस्तूंच्या उत्पादनाबाबत चीनमुळे आपल्या देशाचे काय होत आहे, हे तुम्ही पाहत आहात. चीन त्यांच्या चलनाचे अवमूल्यन करतो आणि आपल्या सरकारमध्ये त्यांच्याविरुद्ध बोलणारे कोणीही नाही. आपण त्यांच्याशी चांगल्याप्रकारे लढा देऊन जिंकणे गरजेचे आहे. कारण, ते आपल्या तिजोरीचा उपयोग स्वत:च्या उभारणीसाठी करत आहेत. चीनशिवाय अनेक देशही हेच करत आहेत. अमेरिकेतून बाहेर जाणारे रोजगार थांबवले पाहिजेत, असे अनेक उद्योगपतींचे मत आहे. आपण हे सगळे थांबवले पाहिजे. त्यासाठी माझ्याकडे उद्योगांसाठी करकपात करण्यासारख्या काही योजना आहेत, असे ट्रम्प यांनी सांगितले.
लोकशाहीचा मुक्तछंद
त्यानंतर भाषणासाठी उभ्या राहिलेल्या हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्या मुद्द्यांचे खंडन केले. क्लिंटन यांनी आपल्या भाषणात देशातील करव्यवस्था अधिक प्रभावी करण्याची भूमिका मांडली. तसेच अमेरिकेकडून चीनसह अन्य देशांबरोबर करण्यात आलेल्या व्यापारी करारांसंदर्भात पुर्नविचार करण्याची भूमिका मांडली. आपला देश सध्या गंभीर संकटात आहे. जगभरातील देश विशेषत: चीन जेव्हा त्यांच्या चलनाचे अवमूल्यन करतात, तेव्हा काय करायचे हे आपल्याला अजून उमगलेले नाही. ते सध्या त्यांच्या सार्वकालीन अशा सर्वोत्तम पातळीवर आहेत. मात्र, ते आपल्या देशाशी जे काही करत आहेत, ते फारच दुख:दायक आहे, असे क्लिंटन यांनी म्हटले. त्यामुळे आपल्याला व्यापारी करारांबाबत पुर्नचर्चा करणे गरजेचे आहे. ते आपले रोजगार घेत आहेत, ते मोबदला देत आहेत, स्पष्ट बोलायचं तर जे आपण करत नाही त्या सर्व गोष्टी ते करत आहेत. त्यासाठी माझ्याकडे उत्तम अशा योजना आहेत. जनतेने आम्हा दोघांच्या योजनांवर नजर टाकल्यास लक्षात येईल की, माझ्या योजनेमुळे १ कोटी रोजगार निर्माण होतील तर ट्रम्प यांच्या योजनेमुळे ३५ लाख रोजगार कमी होतील. त्यामुळे मंदीची परिस्थिती निर्माण होईल, असे क्लिंटन यांनी सांगितले. न्यूयॉर्कच्या हेंपस्टेड इथल्या विद्यापीठाच्या आवारात क्लिंटन आणि ट्रम्प यांच्यात झालेल्या चर्चेकडे अनेकांचे लक्ष लागले होते.