प्रजासत्ताक दिनी एका स्थानिक कार्यक्रमात वडोदऱयाचे महापौर भरत शहा यांनी केलेल्या विधानातून वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. पाकिस्तान आणि अमेरिका हे दहशतवादी निर्माण करणारे देश असल्याचे विधान भरत शहा यांनी केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘सबका साथ सबका विकास’ हे ओबामांकडून पोपटाप्रमाणे वदवून घेतल्याचीही मुक्ताफळे भरत शहा यांनी उधळली आहेत.
भरत शहा आपल्या भाषणात म्हणाले की, “भारत आणि पाकिस्तान एकाच वेळी स्वतंत्र झाले. पण भारताने विकासाची वाट धरली तर, पाकिस्तान आणि अमेरिकेने त्यांच्या देशात दहशतवादी निर्माण करण्याचे कारखानेच उघडले. आज अमेरिकेनेही भारताला स्वीकारले असून नरेंद्र मोदींनी ओबामांकडून पोपटाप्रमाणे सबका साथ सबका विकास हे वदवून घेतल्याचा अभिमान वाटतो आहे.” शहा यांच्या विधानावर काँग्रेस नेते शैलेश अमीन यांनी नाराजी व्यक्त केली. ओबामा यांना २००९ साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून केंद्रातील भाजप सरकारनेच ओबामांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. अशावेळी भाजपच्याच महापौरांनी ओबामांवर टीका करणे निषेधार्ह आहे, असे अमीन म्हणाले.