अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले असतानाच दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्या नौदलाने युद्धानौका पाठवून टेहळणी सुरू केल्याने चीनचा संताप झाला आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन’चा भाग म्हणून अमेरिकेने ‘यूएसएस ड्यूई’ युद्धनौका दक्षिण चीनच्या समुद्रात दाखल केली आहे. अमेरिकेच्या या कृत्यावर चीनने मात्र तीव्र संताप व्यक्त केला आहे.

अमेरिकेची युद्धनौका बुधवारी स्प्रेटली बेटाच्या (मानवनिर्मित- चीनचं बेट) २० किलोमीटर परिसरात पोहोचली असल्याची माहिती समोर आली आहे. पेंटागॉनचे प्रवक्ता जेफ डेव्हिस यांनीही याबाबतची माहिती दिली.

”दक्षिण चीन समुद्रासह आशिया-पॅसिफिक क्षेत्रात आमचा नियमीतपणे अभ्यास सुरू असतो. आम्ही आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केलेलं नाही. नियमांनुसार आम्ही येथे हवाई, नौदलाचे संचालित करू शकतो.”, असे पेंटागॉनचे प्रवक्ते जेफ डेवीस यांनी सांगितले.

चीनने याआधी अमेरिकेच्या अशा कृत्यांना दोषी ठरवलं आहे. अमेरिकेकडून जाणूनबुजून नियमांचं उल्लंघन केलं जातं, असं चीनने वेळोवेळी म्हटलं आहे. मात्र, पेंटागॉनकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणात अमेरिकेचे हे अभियान कोणत्याही एका देशाला किंवा त्यांच्या समुद्र क्षेत्राला उद्देशून केलेले नाही.