अमेरिकेचे मत; शस्त्रास्त्र स्पर्धा वाढीस लागण्याची शक्यता फेटाळली
भारताला अणुसाहित्य पुरवठादार गटाचा सदस्य करून घेण्याच्या आमच्या प्रस्तावावार पाकिस्तानने व्यक्त केलेली नाराजी अनाठायी व चुकीची आहे कारण यातून कुठलीही शस्त्रास्त्र स्पर्धा वाढीस लागणार नाही, त्याउलट अणुऊर्जेचा भारत शांततामय कार्यासाठी वापर करील याचा आम्हाला विश्वास आहे असे अमेरिकेने म्हटले आहे.
अमेरिकेचे प्रसिद्धी खात्याचे उपप्रवक्ते मार्क टोनर यांनी सांगितले की, भारताला एनएसजी म्हणजे अणुसाहित्य पुरवठादार गटाचे सदस्य देणे म्हणजे शस्त्रास्त्र स्पर्धा वाढवणे नाही. पाकिस्तानने चुकीचे अर्थ लावले आहेत. अणुशक्तीच्या शांततामय उपयोगासाठीच भारताला सदस्यत्व दिले जाणार आहे व पाकिस्तानला एवढे समजायला हरकत नसावी. भारताला एनएसजीचे सदस्यत्व देण्यास पाकिस्तानने विरोध केल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, शस्त्रास्त्र स्पर्धेच्या भीतीतून पाकिस्तान विरोध करीत असला तरी ही भीती निराधार आहे. असे असले तरी एनएसजीच्या ४८ सदस्य देशांच्या बैठकीपूर्वी अमेरिकेला अजूनही ठोस काही करता आलेले नाही. २०१५ मध्ये बराक ओबामा यांनी भारत भेटीत एमटीसीआर म्हणजे क्षेपणास्त्र नियंत्रण निकष भारत पाळत असल्यामुळे असे सदस्यत्व द्यायला हरकत नाही असे म्हटले होते पण त्यावर अणुपुरवठादार गटात मतैक्य झालेले नाही. त्यामुळे काही काळ वाट पहावी लागेल. सदस्य देशात या प्रस्तावावर चर्चा चालू आहे. एनएसजीची पुढील बैठक भारताला सदस्यत्व देण्याच्या मुद्दय़ावर आयोजित केलेली नाही. कुठलाही देश या सदस्यत्वासाठी अर्ज करू शकतो पण पाकिस्ताननेही त्यात स्वारस्य दाखवले आहे त्यांनी अर्ज केला तर त्याबाबत मतैक्याने निर्णय घेतला जाईल असे टोनर यांनी स्पष्ट केले.