अमेरिका पाकिस्तानला एएच- १ झेड व्हायपर प्रकारची नऊ हेलिकॉप्टर्स विकणार आहे, त्यांची किंमत १७ कोटी डॉलर्स आहे. ओबामा प्रशासनाने अलीकडे पाकिस्तानला आठ एफ १६ विमाने विकण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर आता हेलिकॉप्टर्सही दिली जाणार आहेत. भारताने तसेच अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांनी त्या वेळी पाकिस्तानला एफ १६ जेट विमाने देण्यास विरोध केला होता. आता व्हायपर हेलिकॉप्टर्स देण्याच्या निर्णयाने प्रादेशिक सुरक्षा समतोल बिघडण्याची शक्यता आहे. पेंटॅगॉनने बेल हेलिकॉप्टर्सला पाकिस्तानसाठी व्हायपर हेलिकॉप्टर्स तयार करण्यास सांगितले आहे. पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या लष्करी सामुग्रीच्या मदतीअंतर्गत ही हेलिकॉप्टर्स दिली जाणार आहेत. संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की फोर्ट वर्थ व अमारिलो या टेक्सासमधील दोन ठिकाणी या हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली जात असून सप्टेंबर २०१८ अखेरीस ही हेलिकॉप्टर्स पाकिस्तानला दिली जाणार आहेत. अमेरिकेची पाकिस्तानला लष्करी मदत १७०१७३१८८ अमेरिकी डॉलर्सची आहे. पाकिस्तानला अमेरिका नऊ पूरक इंधन संच देणार आहे, जो ९५२ दशलक्ष डॉलर्सची लष्करी सामुग्री देणार आहे त्यातील एक भाग आहे. त्याची अधिसूचना गेल्या एप्रिलमध्ये काढण्यात आली होती. गेल्या वर्षी सहा एप्रिलला परराष्ट्र खात्याने काढलेल्या अधिसूचनेत असे म्हटले होते, की अमेरिका पाकिस्तानला ९५ कोटी डॉलर्सची लष्करी सामग्री देणार आहे. पाकिस्तानने एएत-१ झेड व्हायपर प्रकारची १५ हेलिकॉप्टर्स व  एडीएम ११४ आर हेलफायर २ प्रकारची एक हजार क्षेपणास्त्रे, तर टी ७०० जीई ४०१ सी प्रकारची ३२ इंजिने मागितली होती. एच१ टेक्निकल रिफ्रेश मिशन कंप्युटर्स (३६ नग), एएन एएक्यू ३० टार्गेट साइट सिस्टीम (१७ नग), ६२९ एफ २३ अल्ट्रा हायफ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन सिस्टीम्स (२३ नग), एच ७६४ एमबेडेड ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम व इनर्शियल नेव्हीगेश सिस्टीम्स (१९ नग), हेल्मेट माउंटेड डिस्प्ले (३२ नग), एपीएक्स ११७ ए आयडेंटिफिकेशन फ्रेंड अँड फो ( १७ नग), एएन एएलइ ४७ काउंटरमेजर डिस्पेन्सर सेट (१७ नग), एएन एपीआप ३९ सी (व्ही) २ रडार वॉर्निग रिसीव्हर्स (३९ नग), जॉइंट मिशन प्लानिंग सिस्टीम्स (१५ नग), एम १९७ वीस एमएम गन सिस्टीम्स (१७ नग) याप्रमाणे लष्करी सामग्री पाकिस्तानने मागितली होती. बेल एच १ झेड व्हायपर हेलिकॉप्टर्स दोन इंजिनांची असून ती एएच १ डब्ल्यू सुपरकोब्रा या हेलिकॉप्टर्सचीच आवृत्ती आहे. ओबामा प्रशासनाने या वर्षांत पाकिस्तानला ७० कोटी डॉलर्स किमतीची आठ एफ १६ लढाऊ जेट विमाने विकण्याचा निर्णय जाहीर केला आहे.