हुतात्मा दिनानिमित्ताने येथे उभारण्यात आलेल्या फलकांवर भारतीय हुतात्म्यांच्या सोबत अमेरिकी सैनिकांची चित्रे झळकल्याने महापालिकेला ती त्वरेने काढून घ्यावी लागली. यावरून बराच गोंधळ झाल्यानंतर महापौरांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
चंडीगड महापालिकेने शहरात काही ठिकाणी भगत सिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशी देण्यात आल्याचा दिवस ‘हुतात्मादिन’ म्हणून पाळला व त्यासाठी फलक लावले होते.त्यात या तीन हुतात्म्यांसोबत अमेरिकी सैनिकांची त्यांच्या ध्वज व पोशाखासह छायाचित्रे घुसडण्यात आली होती.
या प्रकरणाबाबत विचारले असता चंडीगडच्या महापौर पूनम शर्मा यांनी सांगितले की, या प्रकरणी चौकशी करण्यात येईल.
या कार्यक्रमात युद्धात कामी आलेल्या विधवांचा गौरवही करण्यात येत होता. त्या वेळी शर्मा यांनी अगोदर प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला.  सकाळी आपल्याला त्याबाबत दूरध्वनी आले असून आपण त्याची चौक शी करण्याचे आदेश दिले आहेत, असे त्या म्हणाल्या.सकाळी हे फलक काढूनही टाकण्यात आले त्याचीही आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपचे माजी खासदार सत्यपाल जैन यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांचा निष्काळजी दृष्टिकोन सहन केला जाणार नाही. जे घडले ते दुर्दैवी आहे. अधिकाऱ्यांनी आपण फलकावर कुणाची चित्रे छापतो आहोत याची जाण ठेवायला हवी होती.  कारण त्यांनी आपल्या हुतात्म्यांबरोबर अमेरिकी सैनिकांची छायाचित्रे छापून त्यांचा अवमान केला आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून चंदीगढ शहरात तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. परंतु वरिष्ठ पोलीस व अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित केली.  संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी अन्य संस्था व संघटनांनीही केली.