देशाची सुरक्षा धोक्यात घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानबरोबर शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करणार नाहीत, त्यासाठी पाकिस्ताननेच भारताला विश्वास वाटेल अशा पद्धतीने व्यापारी संबंध पुन्हा सुरू करणे अपेक्षित आहे, असे ट्रम्प प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन हे पुढील आठवड्यात भारत व पाकिस्तानच्या दौऱ्यावर येत असून त्या निमित्ताने अमेरिकेने ही अपेक्षा पाकिस्तानकडून व्यक्त केली आहे. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने नुकतेच दक्षिण आशिया धोरण जाहीर केले होते. त्यात पाकिस्तानने दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले नाहीत तर वाईट परिणामांचा इशारा दिला होता. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी भारताने काय केले पाहिजे, या प्रश्नावर ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले, की पंतप्रधान मोदी यांना या भागात शांतता अपेक्षित आहे पण भारताच्या सुरक्षेचा बळी देऊन ते पाकिस्तानशी शांततेचा पाठपुरावा करू शकत नाहीत, हे उघड आहे. त्यामुळे शांतता प्रयत्न कुठल्या पातळीपर्यंत शक्य आहेत हा मोदी यांचा निर्णय असेल.

भारत व पाकिस्तान यांनी चर्चा सुरू करावी असे अमेरिकेला वाटते व त्यातून दोन्ही देशांचा परस्परांवरील विश्वास वाढू शकेल. त्यातून प्रादेशिक शांतता व स्थिरता निर्माण होईल. पाकिस्तानने दोन्ही देशांतील व्यापार पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत व त्याचे महत्त्व तेथील शक्तिशाली लष्करालाही पटवून दिले पाहिजे. पठाणकोट हल्ला नंतरही पाकिस्तानच्या कारवाया सुरूच राहिल्या. त्यामुळे दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा न करण्याचा निर्णय भारताने घेतला.