भारतासोबत संरक्षणक्षेत्रात सहकार्य वाढविण्यात आम्हाला स्वारस्य आहे, याचा अमेरिकेने मंगळवारी पुनरुच्चार केला. ऑस्ट्रेलिया, कंबोडिया आणि थायलंड या देशांच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी अमेरिकेचे संरक्षण सचिव लिऑन पॅनेटा यांनी ही माहिती दिली.
संरक्षणक्षेत्रात भारताशी सहकार्य वाढवण्याच्या दृष्टिने आम्ही योजना आखली असून त्याची प्रभावी अमलबजावणी होण्यासाठी माझे सहकारी कार्यरत आहेत, असे ते म्हणाले. भारतासोबत संरक्षणक्षेत्रात परस्पर सहकार्य वाढीस लागल्यानंतर दक्षिण आशियात समतोल साधला जाईल, ही दीर्घकालीन प्रक्रिया असून आम्ही त्याबाबत गंभीर आहोत, गेल्या वर्षभरात याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत, असे त्यांनी सांगितले.
अमेरिकेने चीनसोबतच्या संबंधांमध्येही सुधारणा घडवून आणल्याचे ते म्हणाले. चीनसोबत संवादाची प्रक्रिया सुरू झाली असून त्यातही चांगली प्रगती होत आहे. काही महत्त्वाच्या राजकीय बाबींवर आमच्यात एकमत झाले तर भारतीय उपखंडात कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमेरिकेकडून सध्या आशिया-पॅसिफिक या प्रदेशाला खूपच महत्त्व दिले जात असून सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर विराजमान झालेले बराक ओबामा या महिन्याच्या अखेरीस म्यानमारचा दौरा करणार आहेत. त्यांच्या या नियोजित दौऱ्यापूर्वी पॅनेटा म्यानमारला भेट देणार आहेत.