मुजफ्फरनगर रेल्वे दुर्घटनेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर ४० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. ‘आजतक’ या वृत्तवाहिनीनं दिलेल्या बातमीनुसार जिथे अपघात झाला तिथे म्हणजेच खतौलीजवळ रेल्वे रूळ दुरूस्त करण्याचं काम सुरू होतं. उत्कल एक्स्प्रेस वेगात येत होती, मग ट्रेन चालकाने इमर्जन्सी ब्रेक दाबले ज्यामुळे गाडीचे १४ डबे रूळावरून घसरले अशी माहिती समोर येते आहे.

जर खतौलीजवळ रेल्वे रूळ दुरूस्तीचं काम सुरू होतं तर मग उत्कल एक्स्प्रेस वेगात कशी काय आली? हा प्रश्न निर्माण होतो आहे, या प्रकरणाची चौकशी झाल्यावरच या संदर्भातली माहिती समोर येणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून घडलेल्या घटनेबद्दल अतीव दुःख व्यक्त केले आहे.

मृतांना मिळणार नुकसान भरपाई
उत्कल एक्स्प्रेसच्या या भीषण अपघातात आत्तापर्यंत २३ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सगळ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी ५ लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात येईल अशी घोषणा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केली आहे. तर केंद्रीय रेल्वेमंत्रालयाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी साडेतीन लाख आणि जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.

घटनास्थळी अजूनही मदत आणि बचावकार्य सुरू आहे. डबे कापून प्रवाशांना त्यातून बाहेर काढण्यात येतं आहे. शनिवारी संध्याकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी हा अपघात झाला आहे. उत्कल एक्स्प्रेस पुरीहून हरिद्वारच्या दिशेने चालली होती त्याचवेळी खतौलीजवळ हा अपघात झाला आहे.