उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार सत्तेत आल्यावरही राज्यातील महिलांवरील अत्याचार कमी होताना दिसत नाही. बुलंदशहरमध्ये चार महिलांवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच रामपूरमध्ये दोन महिलांचा १४ जणांनी भररस्त्यात विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. महिलांशी असभ्य वर्तन करतानाचा व्हिडीओ नराधमांनी सोशल मीडियावरही अपलोड केला असून पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.

रामपूर जिल्ह्यात टांडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एक गाव आहे. या गावातील दोन महिलांना सुमारे १४ जणांनी घेरले होते. यातील एका नराधमाने महिलांशी असभ्य वर्तन करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गेल्या १५ दिवसांपासून हा व्हिडीओ व्हायरल होत असून असभ्य वर्तन करणाऱ्या तरुणांनीच हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

व्हिडीओमध्ये काही तरुण फारशी वर्दळ नसलेल्या कच्च्या रस्त्यावरुन जाणाऱ्या दोन महिलांचा रस्ता अडवताना दिसत आहे. घाबरलेल्या पीडित महिला आरडाओरडा करत त्या तरुणांना प्रतिकार करण्याचा प्रयत्नही करत आहे. कळस म्हणजे यातील एक तरुण त्या महिलेची ओढणी खेचत असून महिलेच्या जवळ जाण्याचा प्रयत्नही तो करत असल्याचे व्हिडीओत दिसते. वृत्तवाहिन्यांवर या घटनेचा व्हिडीओ प्रसारित होताच संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

उत्तर प्रदेश निवडणुकीतील प्रचारात भाजपने महिलांवरील अत्याचारावरुन तत्कालीन सत्ताधारी समाजवादी पक्षावर टीका केली होती. सत्तेवर आल्यावर महिलांच्या सुरक्षेवर भर देऊ अशी ग्वाही भाजपने दिली होती. पण भाजप सत्तेत आल्यानंतरही उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचे राज्य आल्याचे दिसत नाही अशी टीका आता विरोधक करत आहे.