उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये लोकमान्य टिळक सुपरफास्ट एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरुन घसरल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली दुर्घटनेचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेशमधील एटीएसचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

लोकमान्य टिळक सुपरफास्ट एक्स्प्रेस रविवारी दुपारी उत्तर प्रदेशातील उन्नाव स्थानकावरुन जात होती. यादरम्यान एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरुन घसरले. दुपारी दोन वाजता ट्रेन उन्नाव स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर येत होती. यादरम्यान ही घटना घडली. ट्रेनचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ट्रेनमधील सर्व प्रवासी सुखरुप असल्याचे पोलीस अधीक्षक नेहा पांडे यांनी सांगितले.

अपघातग्रस्त ट्रेनमधील सर्व प्रवाशांना जेवण आणि पाणी देण्यात आले आहे. त्यांच्या पुढील प्रवासासाठी योग्य ते सहकार्य केले जात आहे असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वे अपघातात रेल्वे रुळांचेही नुकसान झाले आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहे.