उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळापासून सुरूवात झाली. ११ जिल्ह्यांमधील ५१ विधानसभा मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडले. यामध्ये अयोध्या, अमेठी, सुलतानपूर, भरीच आणि श्रवस्ती मतदारसंघांचा समावेश होता. पाचव्या टप्प्यात संध्याकाळी पाचपर्यंत ५७.३६ टक्के मतदान झाले होते.

उत्तर प्रदेशात एकुण सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून ११ फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान झाले होते. ८ मार्च रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडेल. त्यानंतर ११ मार्च रोजी पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांसह उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल. यापूर्वी झालेल्या चौथ्या आणि तिसऱ्या टप्प्यात तब्बल ६१ टक्के मतदान झाले होते. दरम्यान, महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालांचा उत्तर प्रदेशच्या आगामी मतदानावर प्रभाव पडण्याची शक्यता व्यक केली जात आहे.

पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी सुरक्षेच्यादृष्टीने या भागात निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. पाचव्या टप्प्यातील  १६०० भागांतील २३०० मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली होती. याशिवाय, १,७९२ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. पाचव्या टप्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये ४० महिलांसह एकुण ६०७ उमेदवार रिंगणात आहेत. १ कोटी ८१ लाख मतदारांपैकी संध्याकाळी पाचपर्यंत सुमारे ५६ टक्के मतदारांनी मतदान केले. या मतदारांचा कौल सर्व राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

* संध्याकाळी पाचपर्यंत ५६.३७ टक्के मतदान

* दुपारी तीनपर्यंत ४९.१९ टक्के मतदान

* १ वाजेपर्यंत ३८.७२ टक्के मतदान

*  उत्तर प्रदेशात ११ वाजेपर्यंत २७ टक्के मतदान

* सकाळी ९ वाजेपर्यंत १०.७७ टक्के मतदान

* उत्तर प्रदेशात पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात