पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही भाजपचे खासदार आणि आमदारांना संयम बाळगण्याबाबत वारंवार सांगत आहेत, पण त्याचा काहीही परिणाम होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आता तर पोलीस अधिकाऱ्यांनाही धमकावण्यापर्यंत या नेत्यांची मजल गेली आहे. भाजपच्या एका महिला खासदाराने पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. जर कामे केली नाहीत तर आतापर्यंत खाल्लेल्या ‘मलई’सह चामडीही सोलून काढेन, अशी धमकी या महिला खासदाराने दिली आहे.

पोलीस अधिकाऱ्याची चामडी सोलून काढण्याची धमकी दिल्याचा आरोप उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील खासदार प्रियंका रावत यांच्यावर आहे. केवळ पोलीस अधिकाऱ्यालाच नव्हे तर, त्यांनी भर पत्रकार परिषदेतही याच धमकीचा पुनरुच्चार केला आहे. त्यांचे वक्तव्य कॅमेऱ्यातही कैद झाले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी आतापर्यंत बरीच ‘मलई’ (पैसे) खाल्ली आहे. आता भाजपचे सरकार आहे. जर या लोकांनी कामे केली नाहीत तर ‘मलई’सह त्यांची चामडीही सोलून काढेन, असे रावत म्हणाल्या. पत्रकार परिषदेत त्यांनी बाराबंकीमध्ये कार्यरत असलेले अपर पोलीस अधीक्षक कुंवर ज्ञानंजय सिंह यांचे थेट नाव घेतले. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आणि राज्यात योगी आदित्यनाथ यांचे सरकार आहे. जे काम करतील तेच या जिल्ह्यात राहतील. आम्ही सगळ्यांचा रेकॉर्ड तपासणार आहोत. यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार रावत यांनी पोलीस अधिकारी सिंह यांना रामनगर परिसरातील हत्या प्रकरणाशी संबंधित दूरध्वनी केला होता. मात्र, सिंह यांनी चुकीच्या पद्धतीने उत्तरे दिली. मी पोलीस अधिकारी आहे. माझे काम मला माहित आहे, असे उद्धट उत्तर दिल्याचे रावत यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. गरज पडल्यास खासदार रावत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक वैभव कृष्ण यांनी सांगितले.