प्रजापती यांच्या समावेशाविरुद्ध राज्यपालांकडे दाद

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीचा बहुधा अखेरचा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी करण्यात आला. उत्तर प्रदेशचे माजी कलंकित खाणमंत्री गायत्री प्रजापती यांचा अन्य तीन जणांसमवेत मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. प्रजापती यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आल्याच्या विरोधात एका सामाजिक कार्यकर्त्यांने राज्यपालांकडे दाद मागितली आहे.

सोमवारी करण्यात आलेल्या मंत्रिमंडल विस्तारात सहा राज्यमंत्र्यांना बढती देण्यात आली आहे. मनोज पांडे, शिवकान्त ओझा, झियाउद्दीन रिझवी यांच्यासह प्रजापती यांना राज्यपाल राम नाईक यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. रियाज अहमद, यासिर शेख, रविदास मेहरोत्रा, अभिषेक मिश्रा, नरेंद्र वर्मा आणि शंखलाल मांझी या राज्यमंत्र्यांना कॅबिनेटमंत्री म्हणून बढती देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकांपूर्वी आपल्या मंत्रिमंडळाची प्रतिमा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी प्रजापती यांची दोन आठवडय़ापूर्वी मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती. त्यामुळे राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आणि तडजोडीचे सूत्र म्हणून त्यांची पुन्हा वर्णी लावण्यात आली.

तथापि, शपथविधी समारंभापूर्वी ४८ तास अगोदर नूतन ठाकूर या सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रजापती यांची मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लावण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्यपालांकडे दाद मागितली आहे.