पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये शानदार कामगिरी केल्यावर आता भाजपने यंदाच्या वर्षाअखेरीस आणि पुढील वर्षी निवडणूक होऊ घातलेल्या राज्यांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. या राज्यांमधील निवडणुकांसाठी रणनिती आखण्यासाठी भाजपने सुरुवात केली. यासाठी भाजपकडून बैठकांनादेखील सुरुवात झाली आहे. गुजरातमधील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मात्र पंतप्रधान मोदींचे होम ग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ भाजपचे स्टार प्रचारक असणार आहेत.

गुजरात भाजपचे अध्यक्ष जीतू वाघानी यांनी रविवारी पक्षाचे आमदार, शहर प्रमुख आणि सौराष्ट्रच्या जिल्हा प्रतिनिधींची बैठक घेतली. राजकोटमध्ये झालेल्या या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक आणि त्यामधील रणनितीविषयी चर्चा झाली. यावेळी भाजपचे कोणकोणते नेते प्रचारासाठी गुजरातमध्ये येऊ शकतात, यावरही चर्चा झाली. निवडणुकीसाठी कोणकोणत्या नेत्यांना स्टार प्रचारक म्हणून बोलावले जाऊ शकते, यावर चर्चा सुरू असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव पुढे करण्यात आले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा या दोन मूळच्या गुजरातच्या नेत्यांआधीच बैठकीत आदित्यनाथ यांच्या नावाची स्टार प्रचारक म्हणून चर्चा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबतच गुजरात भाजपकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणुकासाठी खास निमंत्रण देण्यात येईल, असे वृत्त अहमदाबाद मिररने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. ‘उत्तर प्रदेशात ३०० पेक्षा अधिक जागा जिंकल्यावर आता गुजरातमध्ये १५० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे. भाजपच्या प्रचारकांची यादीदेखील तयार आहे आणि या यादीत उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना स्थान देण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ यांचा समावेश स्टार प्रचारकांमध्ये करण्यात आला आहे. २९ मार्चला अमित शहा दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येणार आहेत. अमित शहांच्या दौऱ्यादरम्यान प्रचारकांची यादी निश्चित करण्यात येईल,’ असे गुजरात भाजपचे अध्यक्ष जीतू वाघानी यांनी म्हटले आहे.