उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामध्ये नायजेरियन तरुणांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता केनियन विद्यार्थिनीलाही मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. रिक्षेतून उतरवून तिला मारहाण करण्यात आली असून या घटनेने नोएडामध्ये राहणाऱ्या आफ्रिकन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शिक्षणासाठी केनियातील १७ वर्षीय तरुणी भारतात आली आहे. सध्या ती ग्रेटर नोएडामध्ये राहते. बुधवारी कॉलेजला जात असताना एका टोळक्याने तिला गाठले. तिला रिक्षेतून उतरवून मारहाण करण्यात आली. मारहाण करुन हल्लेखोर पसार झाले. यानंतर पीडित तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडित तरुणीची प्रकृती सध्या स्थिर असून तिला घरी सोडण्यात आल्याची माहिती कैलाश रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सानिल कपूर यांनी दिली. वर्णभेदातूनच ही मारहाण झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

ग्रेटर नोएडामध्ये मनिष खारी या १२ वीत शिकणाऱ्या मुलाचा शनिवारी मृत्यू झाला होता. नायजेरियन तरुणांनी मनिषला जबरदस्तीने अंमलीपदार्थ दिले आणि अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाला असा स्थानिकांचा आरोप आहे. मनिषच्या मृत्यूनंतर रविवारी ग्रेटर नोएडामध्ये निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चादरम्यान जमावाने पाच नायजेरियन विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. नायजेरिय विद्यार्थ्यांना परिसरातून बाहेर काढा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकार आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीदेखील या मारहाणीची दखल घेतली होती. प्रत्येक विद्यार्थ्याच्या सुरक्षेची हमी उत्तर प्रदेश सरकारने दिली होती. ग्रेटर नोएडामधील मारहाणीचे पडसाद दिल्लीतही उमटले. सुषमा स्वराज यांनी उत्तर प्रदेश सरकारकडून अहवाल मागवला होता.