गोहत्येचे कट्टर विरोधक असलेले योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच पोलिसांनी राज्यातील बेकायदा कत्तलखान्यांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या धडक कारवाईत १२ बेकायदा कत्तलखान्यांना टाळे ठोकले आहे. तसेच गायींची तस्करी केल्याप्रकरणी २७ तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, ४३ जणांना अटक करण्यात आली आहे.

अवैधपणे गायींची तस्करी करणाऱ्या आणि बेकायदा कत्तलखान्यांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेशच पोलीस महासंचालक जावेद अहमद यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती पोलीस महासंचालक मुख्यालयातील प्रवक्त्यांनी दिली आहे. मेरठ विभागातील आठ अवैध कत्तलखान्यांना टाळे ठोकण्यात आले आहे. बरेली आणि वाराणसी येथील प्रत्येकी दोन कत्तलखाने बंद करण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. पालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनेकदा नोटिसा बजावूनही वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मेरठमधील कत्तलखान्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच दोनच दिवसांपूर्वी सर्वच कत्तलखान्यांची पाहणी करून अवैध असलेल्या कत्तलखान्यांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश राज्याचे प्रधान सचिव राहुल भटनागर यांनी सरकारी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

राज्यातील सर्व अवैध कत्तलखाने बंद करण्यात येतील आणि सर्व यांत्रिक कत्तलखान्यांवर पूर्णपणे बंदी घातली जाईल, असे निवडणुकांपूर्वी भाजपच्या जाहीरनाम्यात नमूद केले होते. राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर बेकायदा कत्तलखान्यांवर कारवाईचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानंतर राज्यभरातील पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांनी अवैध कत्तलखान्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये छापेमारी सुरू केली आहे. लखनऊ महापालिकेने बुधवारी महानगर व अलीगंजमधील मांसविक्रीच्या ९ दुकानांना सील ठोकले. तसेच परिसरातील ११ जिल्ह्य़ांमध्ये गुरे व मांस यांची अवैध वाहतूक, कत्तलखाने आणि गोहत्या यांच्या विरोधात व्यापक मोहीम हाती घेण्यात आल्याचे लखनऊ परिक्षेत्राचे महानिरीक्षक ए. सतीश गणेश यांनी मंगळवारी सांगितले होते. यात लखनऊशिवाय उन्नाव, बाराबंकी, रायबरेली, सीतापूर, हरदोई, लखीमपूर खिरी, अमेठी, सुलतानपूर, फैझाबाद व आंबेडकर नगर जिल्ह्यांचा समावेश आहे.