उत्तर प्रदेशमध्ये सत्तेवर असताना समाजवादी पक्षाच्या नेत्यांवर गुंडगिरीचे आरोप होत होते. पण आता सत्ता गेल्यावरही सपाच्या नेत्यांची गुंडगिरी थांबलेली नाही. योगी आदित्यनाथ यांच्या जयजयकार केल्यामुळे संतापलेल्या सपा नेत्याने एका तरुणावर थेट गोळीबार केला. या गोळीबारात १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये असमोली येथे भाजप नेता मोनू सिंह यांचा भाऊ विनीकेत उर्फ नन्हे (वय १७) हा योगी आदित्यनाथ सत्तेवर आल्याने आनंदाच्या भरात ‘योगी जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी करत होता. यादरम्यान स्थानिक पंचायत सदस्या उषा सिंह यांचे पती आणि समाजवादीचे नेते शिशूपाल सिंह हेदेखील तिथून जात होते. योगी आदित्यनाथांचा जयजयकार ऐकून शिशूपाल यांचा पारा चढला आणि त्यांनी संतापाच्या भरात थेट नन्हेवर गोळीबार केला असा आरोप आहे. या गोळीबारात नन्हेचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर शिशूपाल यांच्या समर्थकांनी मोनू सिंह यांच्या घरावर दगडफेक केली. यात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी शिशूपालविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या शिशूपाल हे फरार आहेत. क्षुल्लक कारणावरुन १७ वर्षाच्या मुलाचा बळी गेल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, पोलिसांनी या घटनेमागे राजकीय वैमनस्य कारणीभूत असल्याचे सांगितले. घटनेची चौकशी केली जाईल आणि दोषींना अटक होणारच असे पोलिसांनी सांगितले. शिशूपाल हे मोनू सिंह यांना मारण्यासाठी आले असावे, पण त्यांच्या हाती नन्हे लागला असावा असा अंदाज सिंह यांच्या कुटुंबीयांनी वर्तवला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने बहुमताने विजय मिळवला असून योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी कामाचा धडाकाही सुरु केला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.