उत्तर प्रदेशात सत्तेत येण्यापूर्वी भाजपने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य निर्माण करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. आता भाजप सत्तेवर आल्यापासून उत्तर प्रदेशमधील एन्काऊंटरमध्ये वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये ४३० हून अधिक एन्काऊंटर झाले आहेत. यानुसार राज्यात दर १२ तासांमध्ये एक एन्काऊंटर झाल्याचे आकडेवारी सांगते.

‘एनडीटीव्ही’ च्या वृत्तानुसार गेल्या आठवड्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी आनंद कुमार यांनी उत्तर प्रदेशमध्ये एन्काऊंटर थांबणार नाहीत, असे संकेत दिले होते. राज्य सरकारनेही एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस पथकाला १ लाख रुपयांपर्यंतचे इनाम जाहीर केले आहे. तर सहा महिन्यांचा लेखाजोखा मांडताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील पोलीस सक्रिय असल्याचे सांगितले होते. ‘आज राज्यातील जनतेला सुरक्षित वाटू लागलंय. यापूर्वी पोलीस कारवाई करताना घाबरायचे. आपल्यावरच कारवाई होईल, अशी भीती त्यांना वाटायची. पण आम्हाला हे चित्र बदलायंच असून आता पोलीस सक्रिय झाले आहेत, असे त्यांनी म्हटले होते.

उत्तर प्रदेश पोलिसांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार २० मार्च ते १८ सप्टेंबर या कालावधीत उत्तर प्रदेशमध्ये ४३१ एन्काऊंटर झाले. यामध्ये १७ गुन्हेगार मारले गेले. तर दोन पोलिसांचा मृत्यू झाला होता. एकूण ८८ जण या चकमकींमध्ये जखमी झाले. या चकमकींमध्ये एकूण ११०६ गुन्हेगारांना पकडण्यात यश आले.

सोमवारीदेखील उत्तर प्रदेशमधील इटवाह येथे सुंदर यादव (२७ वर्ष) या गुंडाचा चकमकीत मृत्यू झाला होता. सुंदर यादवविरोधात हत्या, खंडणी, अपहरण यासारखे गंभीर गुन्हे दाखल होते. नाकाबंदीदरम्यान सुंदर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पळ काढण्यासाठी त्याने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात सुंदर यादवचा मृत्यू झाला. तर त्यापूर्वी मुजफ्फरनगर येथे जान मोहम्मद या गुंडाचा चकमकीत खात्मा करण्यात आला होता. जान मोहम्मदवर हत्या, चोरी यासारखे २४ गुन्हे दाखल होते. तर या चकमकींवरुन विरोधी पक्षांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी एन्काऊंटर करणे चुकीचे असल्याचे समाजवादी पक्षाने म्हटले आहे.