महिलांच्या आणि एकूणच सुरक्षेबाबत अनागोंदी असलेल्या उत्तर प्रदेशामध्ये गेल्या काही दिवसांपासून  महिलांवरील अत्याचारांच्या घटना थांबण्याची चिन्हे नाहीत. सामूहिक बलात्कार, मुलींची निर्दयी हत्या करून दरदिवशी िहसाळलेपणाचा कळस गाठणारे हे राज्य महिलांच्या किमान सुरक्षेबाबत निरुत्तर बनले आहे.
पुन्हा तरुणीचा मृतदेह झाडाला लटकविला 
लखनऊ  : उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथे एका १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह गुरुवारी सकाळी झाडाला लटकविलेला आढळला. या तरुणीवर बलात्कार करून तिचा मृतदेह लटकविण्यात आला आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे, तर या तरुणीने आत्महत्या केली असून, तिच्यावर बलात्कार झालाच नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे.ही तरुणी बुधवारी संध्याकाळपासून बेपत्ता होती. तिने कुणालाही न सांगता घर सोडले होते. गुरुवारी सकाळी गावातील मंदिरासमोरील झाडाला तिचा मृतदेह लटकविलेला आढळला. या तरुणीच्या शरीरावर कुठेही जखमी नव्हत्या आणि बलात्कार झाल्याच्या कोणत्याही खुणा नव्हत्या, असे पोलिसांनी सांगितले. मात्र तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
‘त्या’ महिलेची हत्याच
उत्तर प्रदेशातील बहराईच येथे मागासवर्गीय असलेल्या एका ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह बुधवारी अर्धनग्न अवस्थेत झाडाला लटकविलेला आढळला होता. या महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे शवविच्छेदन अहवाल सांगतो. दरम्यान, या प्रकरणातील पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
सारे काही ठीक चाललेय
अखिलेश यादव मात्र आमच्या राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती उत्तम असल्याचे म्हणतात. अन्य राज्यांपेक्षा येथील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळलेली नाही, असे यादव यांनी सांगितले.‘‘माझ्यावर करण्यात आलेली टीका तथ्यहीन आहे. अन्य राज्यांपेक्षा उत्तर प्रदेशातील स्थिती चांगली आहे. या राज्यात गुंतवणूकदार मोठय़ा प्रमाणात का येतात. कायदा-सुव्यवस्थेची स्थिती चांगली असल्यामुळेच ते येतात.’’  राज्याचा विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.
दिल्लीत धावत्या कारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार
नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीत एका २५ वर्षीय तरुणीवर धावत्या कारमध्ये तिघांनी बलात्कार केला. पोलिसांनी या तीनही आरोपींना अटक केली आहे. जितेंद्र, जय भगवान आणि अजय अशी या आरोपींची नावे असून, त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या तरुणीने बुधवारी रात्री पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर या आरोपींना अटक करण्यात आली.