२,२६९ हेक्टर वनजमिनीचे नुकसान; मृतांची संख्या सात
उत्तराखंडच्या जंगलातील वणव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून, रविवारी भारतीय हवाई दलाच्या एका हेलिकॉप्टरद्वारे आगीवर पाण्याचे फवारे मारण्यात आले. ही आग राज्याच्या सुमारे २,२६९ हेक्टर वनजमिनीवर पसरली असून, होरपळून सात जणांचा मृत्यू झाला आहे.
वणव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी रविवारी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. एका हेलिकॉप्टरद्वारे आगीवर पाण्याचे फवारे मारण्यात आले. मात्र खराब हवामानामुळे दुसऱ्या हेलिकॉप्टरचा वापर करता आला नाही. डोंगरातील काही निवासी भागांपर्यंत आग पोहोचल्याने मदतकार्याला वेग देण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तराखंडच्या मुख्य सचिवांसह संबंधित सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
उत्तराखंडमधील आगीचे प्रकरण केंद्र सरकारने गांभीर्याने घेतले असून, मदतकार्यासाठी ६,००० जण तैनात करण्यात आले असल्याचे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. केंद्र सरकारने राज्याला पाच कोटींचा मदतनिधी शनिवारी दिल्याचे जावडेकर म्हणाले.
भारतीय हवाई दलाच्या एमआय १७ या हेलिकॉप्टरची ३ हजार लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे. हे पाणी भीमतळ तलावातून भरून आलमखान, किलबारी आणि नलेना या भागांतील वणव्यावर फवारण्यात येत असल्याचे प्रधान वनसंरक्षक बी. पी. गुप्ता यांनी सांगितले.

काँग्रेसचे भाजप सरकारवर शरसंधान
या दुर्घटनेवरून काँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. मोदी सरकार शांतताप्रिय उत्तराखंड राज्यात राजकीय संकट निर्माण करीत असताना या सरकारला या पर्यावरणाच्या दृष्टीने मोठय़ा संकटावर मात करण्यात अपयश आले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली.

मदतकार्यात एनडीआरएफचे १३० जवान
उत्तराखंडच्या जंगलातील वणव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या १३० जवानांना तैनात करण्यात आले आहे. हा वणवा लवकरात लवकर विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे एनडीआरएफचे संचालक जनरल ओ. पी. सिंग यांनी सांगितले.