उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. आदित्यनाथ यांनी सरकारी कार्यालयांमध्ये ‘पान’ आणि ‘गुटखा’ खाण्यावर बंदी घातल्यानंतर त्रिवेंद्र सिंह रावत यांनी उत्तराखंडमध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यावर ५ हजार रुपये किंवा ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तराखंडच्या विधीमंडळात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याविरोधात विधेयक मंजूर करण्यात आले आहे. आता हा आदेश राज्यातील सर्व महापालिकांमध्ये लागू केला जाणार असल्याची माहिती शहर विकास विभाग अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास पाच हजारांचा दंड आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागेल. ‘आम्ही हा नियम लागू करण्यासाठी कठोर आदेश दिले आहेत. हा नियम पाच महिन्यांपूर्वी अस्तित्वात आला. आतापर्यंत हा नियम फक्त शहरांपुरता मर्यादित होता. मात्र आता हा नियम ग्रामीण भागातही लागू करण्यात येणार आहे. लोकांना सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, कचरा टाकू नये, यासाठी हा नियम लागू करण्यात येणार आहे आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल,’ असे शहर विकास विभागाचे सचिव अरविंद सिंह हयांकी यांनी म्हटले आहे.

उत्तराखंडच्या आधी योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये आणि इमारतींमध्ये पान मसाला, प्लास्टिक, तंबाखूवर बंदी घातली आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी २२ मार्चला या निर्णयाची माहिती दिली. यासोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व सरकारी अधिकाऱ्यांना स्वच्छता राखण्याचे आदेश दिले आहेत. नवा आदेशांनुसार सरकारी कार्यालये, चिकित्सालय, शाळा, महाविद्यालयांमध्ये तंबाखू-गुटख्याचे सेवन करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यासोबतच सरकारी कार्यालयांमध्ये प्लास्टिकच्या वापरावरदेखील बंदी घालण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच योगी आदित्यनाथ यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. उत्तर प्रदेशातील अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. अनेक अवैध कत्तलखाने योगी आदित्यनाथ सरकारकडून बंद करण्यात आले आहेत.